१२६. खरा राजधर्म.

(महाकपिजातक नं. ४०७)


आमचा बोधिसत्त्व कपियोनींत जन्मून वयांत आल्यावर मोठ्या वानरसमुदायांचा राजा होऊन हिमालयाच्या पायथ्याशीं गंगेच्या तीरावर महाअरण्यांत रहात असे. तेथे गंगेच्या तीरावर एक भव्य आम्रवृक्ष होता. त्याची फळें इतकीं गोड असत कीं, त्याला मनुष्यलोकींचें अमृत म्हटलें असतां अतिशयोक्ति व्हावयाची नाहीं. बोधिसत्त्व आपल्या वानरगणांसह तेथें येऊन त्या वृक्षाचीं पक्क फळें खाववून सर्वांना तृप्‍त करित असे. त्या झाडाची एक शाखा गंगेवर वांकली होती, व तिला झालेलीं फळें गंगेंत पडण्याचा संभव होता. असें एखादें फळ वहात जाऊन मनुष्यांच्या हातीं लागलें तर ते शोध करीत तेथें येतील व आपणाला तेथून हालवून देतील अशा धोरणानें बोधिसत्त्व त्या फांदीचीं कोवळींच फळें काढून खावयास सांगत असे. इतकी खबरदारी घेतली तरी एके वर्षी त्या फांदीला मुंग्यांच्या घरट्यांत झालेलें एक फळ चुकून राहिलें, व तें पिकून गंगेंत पडलें. वाराणसीचा राजा जलक्रीडा करण्यासाठीं गंगेंत* जाळी घालून आपल्या स्त्रीमंडळासह स्नानाला गेला असतां तें फळ येऊन त्या जाळ्यास अडकलें. नावाड्यांनीं तें काढून क्रीडा समाप्‍त झाल्यावर राजाला अर्पण केलें. राजानें एक तुकडा आपण खाऊन त्याचे लहान लहान तुकडे आपल्या स्त्रीमंडळाला वांटून दिले. त्या सर्वांना ते फारच आवडले. राजानें तर दुसर्‍याच दिवशीं स्वतः होडींतून जाऊन त्या वृक्षाचा शोध लावण्याचा निश्चय केला, व त्याप्रमाणें पुष्कळ नावा तयार करून भोजनाची वगैरे सर्व सामग्री घेऊन मोठ्या सैन्यासह-वर्तमान तो निघाला. बर्‍याच दिवसांनीं त्या आम्रवृक्षाखालीं राजाच्या नौका येऊन थडकल्या, व त्याचीं रसाळ फळें चाखून राजा आणि सैनिक अत्यंत मुदित झाले. त्या रात्री त्यांनीं त्या झाडाखालींच तळ दिला. बोधिसत्त्व आपल्या रोजच्या नियमाप्रमाणें मध्यरात्रीच्या सुमारास वानरगणाला घेऊन झाडावर आला. सर्व वानर इकडून तिकडे उड्या मारून फळें खाऊं लागले. त्या गडबडीनें राजा जागा झाला, व त्यानें आपल्या सर्व सैनिकांस जागे केलें. एवढा मोठा वानरसमुदाय पाहून राजा म्हणाला, ''यांना जर या अरण्यांत राहूं दिलें तर या वृक्षाचीं फळें तुम्हांला कधींहि मिळणार नाहींत. एका दिवसांत सर्व फळांचा हे दुष्ट वानर फडशा पाडतील. तेव्हां आतां आपापलीं धनुष्यें सज्ज करून यांना चारी बाजूंला वेढा द्या, व उद्यां सकाळ झाल्यावर यांतील एकहि वानर जिवंत ठेऊं नका.''
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* मगरानें पकडूं नये म्हणून गंगेत जाळीं घालून जागा निर्धास्त करीत असत व तेथें राजे लोक जलक्रीडा करीत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सैनिकांनीं जमिनीवर तिन्ही बाजूंनीं वेढा दिला व गंगेच्या बाजूला होड्या ओळीनें रचून ठेऊन त्यांवर शरसंधाननिष्णात धनुर्धर ठेविले. आपणाला वेढलेलें पाहून वानरसमुदाय थरथर कांपूं लागला. कित्येकांची बोबडीच वळून गेली. कित्येक राजाला, तर कित्येक आपल्या कर्माला आणि कित्येक बोधिसत्त्वाला दोष देऊं लागले. पण बोधिसत्त्व निर्भयपणें म्हणाला, ''बाबांनो, तुम्ही घाबरूं नका. संकट जरी फार मोठें आहे तरी माझ्या प्रज्ञेनें आणि बाहुबळानें मी तुम्हाला यांतून पार पाडीन.''

असें म्हणून त्यानें गंगेच्या परतीरीं असलेल्या वेताच्या बेटावर उडी टांकिली, व आपल्या सुदृढ दातांनी त्यांतील अत्यंत उंच वेत्रलता सोडून तिचें एक टोंक त्या बाजूला असलेल्या एका झाडाच्या फांदीला घट्ट बांधून टांकिलें, व दुसरें एक टोंक आपल्या कमरेला बांधून पुनः आम्रवृक्षावर उडी टांकिली. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही कीं, ती वेताची काठी आम्रवृक्षाच्या फांदीपर्यंत पुरण्याजोगी नव्हती. पुढल्या दोन पायांनीं आंब्याची फांदी धरून व मागल्या दोन पायांत वेताची काठी धरून बोधिसत्त्व अंतराळी लोंबत राहिला, आणि म्हणाला, ''आतां वानरगण हो ! हाच तुमच्यासाठी मी सेतु तयार केला आहे. त्वरा करा ! आणि एका मागून एक सर्वजण या सेतूवरून निघून जा.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel