११४. शोकापासून निवृत्त करण्याचा उपाय.
(सुजातजातक नं. ३५२)
एकदां आमचा बोधिसत्त्व एका शेतकर्याच्या कुळांत जन्मला होता. बापाचा तो एकुलता एक मुलगा असल्यामुळें त्याच्यावर घरांतील सर्व माणसांचें अत्यंत प्रेम असे. तो सुजात या नांवानें सर्व गांवांत प्रसिद्ध होता. सुजात सोळा वर्षांचा झाला नाहीं, तोंच त्याचा आजा मरण पावला. व त्यामुळें त्याच्या बापाला अत्यंत शोक झाला. आज्याचें दहन करून त्याचे शरीरावशेष सुजाताच्या बापानें आपल्या शेतांत पुरले, व त्यावर एक थडगें बांधलें. सकाळीं संध्याकाळीं तेथें जाऊन तो शोक करीत असे, व त्यामुळें त्याला आपला व्यवहार पहाण्यास सवड सांपडत नसे. आणि दिवसेंदिवस त्याच्या शरीरावर शोकाचा परिणाम स्पष्ट दिसूं लागला. सुजाताला आपल्या पित्याच्या वर्तनाबद्दल फार वाईट वाटलें, आणि त्याला कसें सुधारावें या विवंचनेंत तो पाडला. अशा स्थितींत असतां गांवाबाहेर एक बैल मरून पडलेला त्याला आढळला. तेव्हां एक पाण्याचें भांडें आणि एक दोन गवताच्या पेंढ्या घेऊन तो त्या बैलाजवळ गेला आणि त्याला कुरवाळून म्हणाला, ''बा बैला, उठ. हें पाणी पी, व हें गवत खा.''
अशा रीतीनें बैलाशीं चाललेलें सुजाताचें बोलणें तिकडून जाणार्या येणार्या लोकांनीं ऐकलें आणि त्याला तेथें शोकाकुल होऊन बसलेला पाहून ते म्हणाले, ''बा सुजाता, तूं आमच्या गांवांतील मुलांत शहाणा मुलगा आहेस अशी आमची समजूत होती; परंतु हा काय मूर्खपणा चालविला आहेस ! मेलेल्या बैलाला गवत पाणी देऊन उठावयास काय सांगतोस ! चल आमच्याबरोबर घरीं.''
पण सुजातानें त्यांचें बोलणें न ऐकतां बैलाला पाणी पी, आणि गवत खा, असें बोलून गोंजारण्याचा व तो उठत नाहीं याबद्दल शोक करण्याचा प्रकार तसाच चालू ठेवला. शेतकर्यांनीं जाऊन त्याच्या बापाला मुलाला वेड लागलें आहे व तो मेलेल्या बैलाशीं असें असें बरळत बसला आहे, वगैरे सर्व वर्तमान सांगितलें. तें कानीं पडतांच त्याचा पितृशोक मावळला व पुत्रशोकाचा उदय झाला. बाप गेला तो कांहीं परत येत नाहीं, परंतु जिवंत असलेल्या मुलाची अशी दशा झाली, हें ऐकून त्याची कंबर पुरीं खचली. बिचारा तसाच धांवत धांवत मुलाजवळ गेला आणि त्याला म्हणाला, ''बाळा ! हा प्रकार तूं काय चालवला आहेस ? मेलेल्या बैलाला पाणी देऊन आणि गवत घालून जिवंत कसें करितां येईल ? तूं येवढा शहाणा असून तुला ही अक्कल असूं नये काय ? तुझ्यावर प्रपंचाचा कांहींच भार पडला नसतां तूं एकाएकीं असा वेडा कसा झालास ?''
सुजात म्हणाला, ''बाबा, मी वेडा आहे कीं, तुम्ही वेडे आहां हें मला पहिल्यानें सांगा.''
त्यावर त्याचा पिता अत्यंत निराश होऊन म्हणाला, ''अरेरे, तूं अगदींच बिघडलास असें दिसतें. माझा तूं आजन्मांत असा उपमर्द केला नाहींस. पण आज स्वतः वेडगळपणा करीत असतां मलाच वेडा म्हणावयास लागलास !''
सुजात म्हणाला, ''पण बाबा असे रागावूं नका. या बैलाचे डोळे, पाय, शेपटी, तोंड, नाक इत्यादी सर्व अवयव जशाचे तसे आहेत. कावळ्यांनीं किंवा कुत्र्यांनीं त्याला कोठेंही जखम केलेली नाहीं. तेव्हां हा बैल पाणी वगैरे पाजलें असतां उठून उभा राहील अशी मला आशा वाटते. पण आमच्या आजोबाला जाळून त्याच्या अस्थी तुम्ही थडग्यांत पुरून ठेवल्या, व त्या थडग्याजवळ जाऊन सकाळ संध्याकाळ शोक करीत असतां तो कां ? आजोबाच्या जळक्या अस्थींतून ते पुनः अवतरतील असें तुम्हांस वाटत आहे काय ? सबंध शरीर कायम असलेल्या बैलाबद्दल शोक करणारा मी वेडा, कीं ज्याला केवळ जळलेल्या अस्थी शिल्लक राहिल्या आहेत अशा आमच्या आजोबाबद्दल शोक करणारें तुम्ही वेडे, हें मला प्रथमतः सांगा.''
हें सुजाताचें शहाणपणाचें बोलणें ऐकून त्याचा पिता चकित झाला, व म्हणाला, ''बाबारे, मीच तुझ्यापेक्षां जास्त वेडा आहे, यांत शंका नाहीं ! मृत मनुष्याबद्दल शोक करणें व्यर्थ आहे हें दाखविण्यासाठीं तूं जो उपाय केला तो स्तुत्य आहे; आणि आजपासून माझ्या पित्याचा शोक सोडून देऊन मी माझ्या कर्तव्याला लागेन. तुझ्यासारखा पुत्र आमच्या कुलांत जन्मला याचें मला भूषण वाटतें.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.