राजाच्या मनांत संशयानें ठाणें घेतल्यामुळे बोधिसत्त्वाच्या हालचालींवर तो स्वतः नजर ठेवूं लागला. त्याला असें आढळून आलें कीं, सर्व लोक बोधिसत्त्वाची तारीफ करीत असून आपणापेक्षांहि त्याजविषयीं त्यांची विशेष पूज्यबुद्धि आहे. अर्थात् ही गोष्ट राजाला समजली नाहीं. आपणापेक्षां पुरोहिताचे देव्हारे जास्त माजणें त्याला अत्यंत अनिष्ट वाटलें. न जाणो लोक आपणावर अप्रसन्न होऊन आपणाला पदच्युत करतील, आणि पुरोहितालाच राज्यावर बसवतील ! या शंकेनें त्याचें मन पीडित झालें. तो एकांतांत काळकाला म्हणाला, ''बा काळका, या पुरोहिताचा काटा माझ्या राज्यांतून काढून टाकला पाहिजे, याबद्दल मला शंका राहिली नाहीं. परंतु जर याचा मी एकदम वध केला तर सर्व राष्ट्र माझ्यावर उठेल. तेव्हां कोणत्या युक्तीनें याचा नाश करतां येईल हें मला सांग. खर्‍या राजनीतीचें मर्म तुला ठाऊक असल्यामुळें याप्रसंगीं तुझाच सल्ला मला फार उपयोगी पडेल.''

काळक म्हणाला, ''महाराज, हें काम अगदींच सोपें आहे. राजाला कोणत्याहि गृहस्थाला दंड करावयाचा असेल तर हजार कारणें शोधून काढतां येत असतात. आपण त्याला बोलावून आणून एका रात्रींत एक उत्तम बगीचा तयार करण्यास सांगा. हें काम करतां आलें नाहीं, तर देहान्त शासन करीन अशी धमकी दिली म्हणजे तो आपण होऊनच या राज्यांतून पळून जाईल.''

राजाला ही त्याची युक्ती फार पसंत पडली. तो बोधिसत्त्वाला बोलावून आणून म्हणाला, ''बा पंडिता, उद्यां सकाळीं एका उत्तम उद्यानांत क्रीडा करण्याची माझी इच्छा आहे. तेव्हां आजच्या आज सर्व फलपुष्पवृक्षानीं संपन्न असें एक उद्यान तयार कर.''

ही राजाज्ञा ऐकून बोधिसत्त्व मोठ्या काळजींत पडला. घरीं जाऊन भोजन करून विचार करीत अंथरुणावर पडला असतां त्याच्या तेजानें शक्राचें आसन तप्‍त झालें. शक्र याचें कारण काय तें जाणून एकदम देवलोकांतून बोधिसत्त्वापाशीं आला आणि म्हणाला, ''बा सत्पुरुषा तूं चिंतातूर होऊं नकोस. तुझ्या चिंतेचें कारण मला सांग म्हणजे मी तें तात्काळ दूर करतों.''

बोधिसत्त्वानें घडलेलें सर्व वर्तमान इंद्राला निवेदन केलें. इंद्रानें त्याचें समाधान करून त्याच रात्रीं वाराणसीजवळ एक दिव्य उद्यान निर्माण केलें. आणि आपण कोण आहे, हें बोधिसत्त्वाला सांगून तो अंतर्धान पावला. पहाटेस बोधिसत्त्वानें त्या उद्यानाची शोभा स्वतः पाहिली आणि राजसभेच्या प्रसंगीं तेथें जाऊन तो राजाला म्हणाला, ''महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणें उद्यान तयार आहे. तें पाहून आपणास आवडतें कीं नाहीं हें मला सांगा. राजाला ही गोष्ट विचित्र वाटली. परंतु स्वतः उद्यान पाहिल्यावर त्याचा संशय फिटला. पण बोधिसत्त्वाविषयीं मत्सराग्नि मात्र दुणावला. त्यांत काळकानेंहि आणखी तेल ओतलें. तो म्हणाला, ''महाराज, जो माणूस एका रात्रींत नानाविध फल पुष्पांनीं भरलेलें उद्यान रचूं शकतो तो आपलें राज्य घेण्यास उशीर लावील काय ? तेव्हां याचें आतांच निर्मूलन केलेंच पाहिजे. याला एखादी देवता प्रसन्न असावी. तिच्या सहाय्यानें त्यानें हें उद्यान तयार केलें असावें. परंतु एक गोष्ट केली म्हणून देवता सर्वच करील असें नाहीं. कां कीं, एक वर दिल्यानें पुष्कळ वर्षाचें तप समाप्‍त झालें, असें देवता समजत असतात; आणि भक्तानें दुसरा वर मागितला तर उलट रागावून त्या त्याचाच नाश करितात. तेव्हां आपण जर याला रोज एकेक नवीन गोष्ट निर्माण करण्यास सांगितली आणि तो आपल्या देवतेकडे नवीन वर मागत गेला तर ती देवताच रागावून त्याचा नाश करून टाकील.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel