पण त्यांतील कांहीं सत्त्वशील वानर म्हणाले, ''महाराज, आपण आमचे राजे अहां, आणि आपली पाठ तुडवीत आम्ही कसें जावें ?''

बोधिसत्त्व म्हणाला, ''आपल्या प्रजेचें रक्षण करणें हें राजाचें कर्तव्य आहे, आणि अशा समयीं तुम्हीं विवंचनेंत पडलां तर तुमचा आणि माझा येथेंच नाश होणार आहे.''

तेव्हां बोधिसत्त्वाच्या आज्ञेप्रमाणें सर्व वानरगण त्याच्या पाठीवरून गंगापार गेले. आणि त्यायोगें बोधिसत्त्वाची छाती फुटून गेली. तो बेशुद्ध होऊन तेथेंच लोमकळत राहिला. सकाळीं राजाला सगळे वानर तेथून पळून गेल्याचें दिसून आलें व हें झालें कसें याचा विचार चालला असतां बोधिसत्त्व वेताच्या आणि आंब्याच्या फांदीच्या दरम्यान लोमकळत असलेला दिसला. हें अद्वितीय आश्चर्य पाहून राजा अत्यंत चकित झाला ! आणि धनुर्ग्राहकांला म्हणाला, ''या वानराच्या खालीं एक जाळें धरावयास सांगा, व याला कांहींएक इजा होऊं न देतां बाणांनीं वेताची काठी आणि झाडाची फांदी तोडून खालीं पाडा.''

राजाच्या आज्ञेप्रमाणें चार होडीच्या डोलकाठयांला एक मोठें जाळें बांधून कुशल धनुर्ग्राहकांनीं बोधिसत्त्वाच्या हातांतील फांदी आणि पायांतील वेताची काठी एकदम तोडून त्याला अचुक त्या जाळ्यांत पाडलें, व उचलून राजाजवळ नेलें. त्याला आपल्यासमोर बसवून राजा म्हणाला, ''तुझें साहस पाहून मला फार आश्चर्य वाटतें. वानरगणाला तारण्यासाठी तूं आपल्या शरीराचा सेतु केलास, आणि भयंकर कष्ट सहन केलेस, याचें कारण काय बरें ? हे वानर तुझे कोण आहेत ? आणि तूं त्यांचा कोण ?''

बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज ! मी त्यांचा राजा आहें, आणि ते माझे अनुयायी होत. मनुष्यलोकीं राजाचे अधिकार निराळे समजले जातात. लोकांकडून करभार वसूल करून राजानें आपली यथेच्छ चैन करावी. सैन्याच्या जोरावर परराज्यांवर हल्ले करावे आणि आपली राज्यतृष्णा भागवावी इत्यादिक कामांमध्यें तुम्ही राजेलोक दक्ष असतां. पण आम्ही राजाचें कर्तव्य निराळें समजतों. आपले प्राण देखील खर्ची घालून अनुयायांना सुखी करावें, हाच आमचा धर्म होय, आणि म्हणूनच मी वेत आणि फांदी यांच्या दरम्यान भयंकर वेदना सहन करून लोंबत राहिलों. माझे अनुयायी सुखानें परतीरीं जात असलेले पाहून माझ्या वेदनांनीं मला दुःख न होतां सुख झालें; माझ्या बंधनानें मला त्रास न होतां आनंद झाला. कांकीं, ज्यांच्या सुखासाठीं मी त्यांचा नेता झालों तें माझें कर्तव्य बजावण्याला मला उत्तम संधी सांपडली. आतां आम्हां जनावरांपासून तुम्हांला कांहीं शिकावयाचें असेल तर तें हेंच आहे कीं, आपल्या प्रजेच्या सुखासाठीं राजानें आपले प्राणदेखील बळी देण्यास तत्पर असलें पाहिजे. ही एकच गोष्ट तुम्हीं मजपासून शिका. त्यांत तुमचें आणि तुमच्या प्रजेचें खरें कल्याण आहे.''

असे उद्‍गार तोंडावाटें निघाले नाहींत तोंच बोधिसत्त्वाच्या शरीरांत प्राणांतिक वेदना सुरू झाल्या. तथापि त्या शांतपणें सहन करून बोधिसत्त्वानें समाधानानें प्राण सोडले. राजानें त्या कपिराजाची उत्तरक्रिया सार्वभौम राजाला साजेल अशी केली, व त्याच्या अस्थी घेऊन तो वाराणसीला आला. तेथें त्या अस्थींवर माठा स्तुप बांधून राजानें त्याच्या पूजेसाठीं योग्य नेमणूक करून दिली; व या प्रमाणें बोधिसत्त्वाच्या शरीरावशेषांचा मोठा गौरव केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel