ब्राह्मणानें संजयाला प्रश्न केल्यावर तो म्हणाला, ''पुरोहित महाराज, रोज मृत्यू मला ग्रासीत आहे. तेव्हां आपल्या प्रश्नाचें उत्तर देण्यास अवकाश कोठला ?'' (येथें मृत्यू ग्रासित आहे याचा टीकाकारांनी भलताच अर्थ केला आहे. परंतु मला असें वाटतें कीं, संजयकुमार परमधार्मिक असल्यामुळें त्याला मृत्यूचें अत्यंत भय वाटत असेल व तो सतत धर्माचरणांत काळ घालवित असेल. एवढ्यावरूनच त्यानें आपणास अवकाश नाहीं असें सांगितलें असावें.)

पुरोहित ब्राह्मण फार कंटाळला आणि म्हणाला, ''अशी ही त्रिस्थळी यात्रा करूनदेखील आमच्या प्रश्नाचें योग्य उत्तर मिळत नाहीं. मग तुमच्या वडिलांनींच परस्पर मला मार्गाला लाविलें असतें तर काय वाईट झालें असतें.'' हें ऐकून संजय म्हणाला, ''पुरोहित महाराज, असे निराश होऊं नका. माझा धाकटा संभव ज्याला पुष्कळ फुरसत असते. सध्यां त्याचें वय लहान असल्यामुळें तो दिवसभर आपल्या बालमित्राबरोबर खेळत असतो. तेव्हां त्याजपाशी जाऊन तुम्ही या प्रश्नांचा खुलासा करवून घ्या.''

पुरोहितब्राह्मणाला प्रथमतः ही नुसती थट्टा असावी असें वाटलें परंतु अखेर एकादां संभवाला भेटून काय गंमत होते हें पहावें असा विचार करून तो त्याच्या शोधाला गेला. संभवपंडित आपल्या मित्रांसह शहराच्या बाहेर खेळण्यांत गुंतला होता. राजाच्या पुरोहिताचा थाट पाहून त्याचे सवंगडे चकित झाले व इतस्ततः पळू लागले पण संभवानें त्यांना धीर देऊन आपल्याजवळ ठेवून घेतलें. पुरोहित जवळ येऊन संभवाला म्हणाला, ''संजयानें मला तुजपाशीं पाठविलें आहे. आमच्या राजाला राजधर्म कोणता याचें संक्षेपानें उत्तर पाहिजे आहे आणि तें तूं देऊं शकशील असें तुझ्या भावाचें म्हणणें आहे.''

संभव म्हणाला, ''पुरोहित महाराज तुम्ही आमच्या घरीं येऊन विन्मुख होऊन जाऊं नये एवढ्याचसाठीं मी या प्रश्नाचें उत्तर देतों. राजा मी सांगेन त्या राजधर्माप्रमाणें वागो न वागो त्याची मला क्षिती नाहीं. राजाचें पहिलें कर्तव्य म्हटलें म्हणजे त्यानें आजचें काम उद्यावर टाकणार्‍या माणसाचा सल्ला कधीहि घेतां कामा नये. आजचें काम आजच करणें यांतच खरें कल्याण आहे. जो मनुष्य आपले दोष दाखवून देईल, आपण नश्वर आहे याची आठवण देईल, आणि आपणाला कुमार्गाला लावणार नाहीं. अधर्मावर विश्वास ठेवणार नाहीं, व अनर्थकारक कर्मे आचरणार नाहीं तोच राज्यपदावर आरूढ होण्यास योग्य होय. कां कीं, शुक्लपक्षांतील चंद्राप्रमाणें त्याची सदोदित अभिवृद्धि होत जाते आणि तेणेकरून तो आपल्या प्रजेस सुखी करतो.''

त्या लहान मुलाचा खुलासा ऐकून सुचीरत ब्राह्मण फारच संतुष्ट झाला आणि १०० मोहरा त्याला देऊन त्यानें त्याचा गौरव केला. त्यानें दिलेलें उत्तर नीट लिहून घेऊन पुरोहितब्राह्मणानें तें आपल्या राजाला सादर केलें. राजानें तदनुसार आपलें वर्तन ठेवून सर्व प्रजेकडून धन्यता मिळविली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel