सूर म्हणाला, ''मित्रा, हे लोक इतके अडाणी आहेत कीं त्यांना अमृत जरी पाजलें तरी ते कृतघ्न होऊन उपकार करणार्‍याच्या जिवावर उठतील. पण आमच्या काशीराष्ट्रांतील लोक अत्यंत सभ्य आहेत. तेथें जाऊन आपण हा धंदा सुरू करूं. तेणेकरून मी माझ्या देशाचा कार्यभाग केल्यासारखें होईल व या नवीन पेयाच्या रूपानें आमचें नांवहि चिरकाल राहील. त्याप्रमाणें त्यांनीं काशीला जाऊन तेथील राजाच्या मदतीनें आपला धंदा सुरू केला. पण कांहीं कालानें तेथल्या लोकांनींहि यांच्याविरुद्ध बंड केलें.

अशा रीतीनें दोन तीन शहरांत अनुभव मिळाल्यावर शेवटीं ते श्रावस्थीला आले. त्या वेळीं तेथें सर्वमित्र नावाचा राजा राज्य करीत होता. त्यानें राजधर्माला अनुसरून सुराला आणि वरुणाला आपल्या पदरी आश्रय दिला व भट्टयांला वगैरे लागणारें सर्व सामान त्यांना पुरविण्याविषयीं आपल्या भांडागारिकाला हुकूम केला.

आतां इंद्राला अशी चिंता उद्भवली कीं, जर सर्वमित्र राजा मद्यपानाच्या व्यसनांत सांपडला तर जंबुद्विपांत एकहि राजा धार्मिक राहिला नाहीं असे म्हणावें लागेल. आणि धार्मिकतेचा लोप झाल्यामुळें स्वर्गांत येणार्‍या प्राण्यांची संख्या फार कमी होईल. आणि त्यामुळें देवदानवांचें युद्ध जुंपलें असतां देवांची संख्या कमी असल्यामुळें दानवांचा जय होईल व देवांचा पराजय होईल.

अशा विवंचनेंत देवांचा इंद्र पडला असतां सर्वमित्राला मद्यपानापासून परावृत्त करण्याची त्याला एक युक्ति सुचली व ब्राह्मणवेषानें मातीचा घडा खांद्यावर घेऊन तो श्रावस्थीमध्यें प्रकट झाला. व राजाच्या प्रासादाजवळ अंतरिक्षांत उभा राहून 'हा घडा विकत घ्या, हा घडा विकत घ्या' असें मोठमोठ्यानें ओरडत सुटला. प्रासादावरून त्याला पाहून राजा म्हणाला, ''अंतरिक्षांत संचार करणारा तूं योगी आहेस कीं देव आहेस ? बरें; तुझ्या अंगीं मोठें सामर्थ्य आहे असें म्हणावें तर हा घडा विकण्याची तुला हाव कां ? आम्ही तुझ्या या कृत्यानें गोंधळून गेलों आहों. तर तुझ्या आगमनाचें कारण सांगून व या कुंभांत कोणता पदार्थ आहे हें सांगून आमच्या शंकेचें निरसन कर.''

इंद्र म्हणाला, ''माझ्या संबंधानें जें कांहीं सांगावयाचें आहे तें मी शेवटीं सांगेन. प्रथमतः या कुंभाचें वर्णन ऐका. यांत तेल, तूप, दही, दूध वगैरे पदार्थ नाहीं आहेत. पण यांत असा अपूर्व पदार्थ आहे कीं ज्याचें प्राशन केलें असतां मनुष्य रस्ता समजून कड्यावरून खालीं पडेल, शेणाच्या डबक्यांत पडेल किंवा गराटांत पडेल, तो अभक्ष्य पदार्थांचें भक्षण करील; खाण्यासाठीं माजलेल्या बैलासारखा इकडे तिकडे हिंडत फिरेल. नाचेल, उडेल, बागडेल, रस्त्यांतून खुशाल नागडा उघडा जाईल, भररस्त्यावर किंवा गटरांत प्रेतासारखा निजून राहील. जें बोलूं नये तें बोलेल. लोकांशीं भांडण उकरून काढील, असा पदार्थ या घड्यांत भरलेला आहे. ज्याच्या प्राशनानें या जंबुद्वीपाच्या इतर प्रांतांत पुष्कळ कुटुंबें धुळीला मिळालीं आहेत, कुटुंबांमध्यें शांती नष्ट झाली आहे, आईबाप इत्यादि वडील माणसाचा तरुणांकडून मान राखला जात नाहीं आणि ज्याच्या प्राशनानें पुष्कळ लोक घोर नरकांत पडलेले आहेत, असा पदार्थ या कुंभांत भरलेला आहे, जर आपणास जरूर असेल तर हा विकत घ्या.''


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel