१४२. संगतीचें फळ.

(सत्तीगुंबजातक नं. ५०३)

उत्तर-पांचाल देशांत पांचाल नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याला शिकारीचा फार नाद होता. एके दिवशीं मृगाच्या मागें लागला असतां त्याचा रथ सेनेपासून फार दूर अंतरावर गेला. परंतु मृग कांहीं त्याला सांपडला नाहीं.

तेथें कांहीं झोपड्या त्याच्या दृष्टीस पडल्या. तो फार थकून गेल्यामुळें जवळच्या एका झाडाखालीं रथांतील आसन ठेवावयास लावून त्यावर राजा निद्रित झाला. सारथी त्याचे पाय दाबीत होता. पण राजाला नीज लागली असें पाहून तोहि झोंपी गेला. आपण एकाकी आहोंत या शंकेनें राजाला कांहीं नीट झोंप लागली नाहीं.

त्या झोपड्या चोरांच्या होत्या. सर्व चोर आपल्या उद्योगासाठीं गेले होते. त्यांचा स्वयंपाकी तेवढा झोपडींत होता. व त्यांनीं बाळगलेला एक पोपटहि तेथें होता. राजाला निद्रिस्त पाहून तो स्वयंपाक्याला म्हणाला, ''हा पहा येथें दुपारच्या वेळीं राजा निद्रिस्त झाला आहे, याला मारून याचे अलंकार काढून घेऊं, ऊठ लवकर. जोंपर्यंत तो जागा झाला नाहीं तोंपर्यंत त्याला व त्याच्या सारथ्याला मारून पाचोळ्यांत लपवून ठेवूं व त्याची वस्त्रें प्रावरणें आणि अलंकार आपण घेऊं.''

स्वयंपाकी म्हणाला, ''भो मित्रा, उगाच बडबड काय चालविली आहेस ? राजाच्या अंगावर हात टाकणें म्हणजे अग्नींत प्रवेश करण्यासारखें आहे.'' तें ऐकून पोपटाला फार राग आला व तो म्हणाला, ''आमच्या मालकासमोर तूं मोठ्या गप्पा ठोकीत होतास. इतकेंच नव्हे दारू पिऊन तूं आमच्या मालकिणीचाही उपमर्द केलास. पण आज तुझें सामर्थ्य कोणीकडे गेलें ?''

राजा या संवादानें दचकून उठला व सारथ्याला म्हणाला, ''बा सारथ्या, येथें हा पोपट विलक्षणपणें बोलतो आहे आणि अशा या अमंगल स्थलापासून दूर जाणें मला अत्यंत इष्ट वाटत आहे ः ऊठ लवकर रथ तयार कर.'' राजाच्या आज्ञेप्रमाणें सारथ्यानें रथ तयार करून क्षणार्धात तो वायुवेगानें चालविला. तें पाहून पोपट मोठमोठ्यानें ओरडत सुटला. 'आमचीं माणसें गेलीं कोठें ? हा राजा आमच्या हातीं आला असतांना त्याला लुबाडल्यावाचून आम्ही जिवंत जावूं देत आहोंत. कोण हा अपराध ! आणि काय हा वेडेपणा !''

या प्रमाणें त्या पोपटाची आरडाओरड चालली असतांना व तो इकडून तिकडून उडत असतांना नदीच्या काठाकाठानें त्या डोंगराला वळसा देऊन सारथ्यानें दूर अंतरावर रथ आणला. तेथें पुनः त्याला कांहीं पर्णकुटिका दिसल्या. घोडे थकून गेल्यामुळें सारथ्यानें कांहीं वेळ रथ उभा केला.

इतक्यांत तेथील एक सुंदर पोपट (हाच आमचा बोधिसत्त्व होता.) मोठ्या आदरानें राजाला म्हणाला, ''महाराज, या आश्रमांत तुमचें स्वागत असो. आमच्या पर्णकुटिकेंत प्रवेश करून मीं कांहीं फलमूलें असतील त्यांचा स्वीकार करा. येथील ॠषिगण अरण्यांत कंदमूलादिक पदार्थ गोळा करण्यासाठीं गेले आहेत व मी दुर्बल पक्षी असल्यामुळें माझ्याकडून आपलें आदरातिथ्य यथासांग होणें शक्य नाहीं. म्हणून आपणाला विनंती करितों कीं, हा आश्रम आपलाच आहे असें समजून येथें असलेल्या फलमूलांचा अंगिकार करा आणि आमच्या झर्‍याचें थंड पाणी पिऊन विश्रांति घ्या.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel