९४. भेसूर प्राण्याचा उपयोग.

(व्यग्घजातक नं. २७२)

सरहद्दीजवळील गांवच्या शेजारीं एका जंगलांत वाघ आणि सिंह रहात होते. ते जनावरांला मारून तेथें आणून खात असत. तें पाहून त्या अरण्यांत रहाणारा वनदेव आपल्या मित्राला म्हणाला, ''हे दोघे आमच्या या सुंदर अरण्याची हानी करीत आहेत. जनावराला मारून त्यांचे अवशेष भाग येथें टाकून दिल्यामुळें घाण होते व आम्हास त्रास होतो. तेव्हां यांना भय दाखवून येथून घालवून द्यावें हें बरें. असले हिंस्त्र प्राणी आमच्या या सुंदर वनांत नको आहेत.''

त्यावर दुसरा वनदेव म्हणाला, ''बा मित्रा, तुझे म्हणणें रास्त नाहीं, या प्राण्याच्या योगें आम्हाला थोडा त्रास होतो ही गोष्ट मला कबूल आहे; परंतु त्यांच्या भेसूरपणाचा आम्हास फार उपयोग होतो. ते जर येथें नसते तर जवळच्या गांवांतील लोकांनीं हें जंगल पार तोडून खलास केलें असतें ! तेव्हां हें जंगल समूळ नष्ट होऊन जाण्यापेक्षां त्याचा कांहीं भाग घाणेरडा झाला तरी पुरवला.''

पहिल्या वनदेवाला ही गोष्ट पसंत पडली नाहीं. त्यानें अक्राळ विक्राळ रूप दाखवून त्या वाघाला आणि सिंहाला तेथून पळवून लावलें. त्याचा परिणाम त्याला लवकरच भोगावा लागला. जंगलांत सिंह प्राणी राहिले नाहींत असें पाहून लाकूडतोड्यांनीं त्यावर हल्ला केला, आणि त्याच्या नाशास सुरुवात केली. तें पाहून पहिल्या वन देवाला फार दुःख झालें. आणि वाघ रहात होता तेथें जाऊन त्याला परत आणण्याची त्याने फार खटपट केली. परंतु वाघानें आणि सिंहानें त्याचें म्हणणें ऐकलें नाहीं. इकडे लाकूडतोड्यांनीं त्या जंगलाचा समूळ विध्वंस केला व तेथें शेतें तयार केलीं. वनदेवांच्या आश्रयस्थानाचा भंग झाल्यामुळें आपल्या मुलाबाळांना घेऊन आश्रयासाठीं त्यांना भटकत फिरावें लागलें.

तात्पर्य, हिंस्त्र प्राण्यापासून थोडा त्रास होत असला, तरी त्यांचा भेसूरपणा दुष्टापासून आपलें रक्षण करण्यास उपयोगी पडतो, हें विसरतां कामा नये.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel