परंतु मृग राजाला किंवा त्या सूदाला पाहून इतस्ततः पळत सुटत, व एक मृग मरेपर्यंत चार पांच मृगांना बाण लागून ते घायाळ होत असत; आणि कधीं कधीं त्या जखमांमुळें मरण पावत असत. बोधिसत्त्वाच्या अनुयायी मृगांनीं ही गोष्ट बोधिसत्त्वाला कळविली, तेव्हां शाखाला बोलावून तो त्याला म्हणाला, ''मित्रा, एकासाठीं पुष्कळ मृगांचा नाश होत आहे. दररोज एकाचें मरण तर चुकावयाचें नाहींच, पण एवढ्यासाठीं इतरांचा नाश होऊं न देणें आम्हांस शक्य आहे. आम्हीं राजाला अशी विनंती करून कीं, आजपासून बाणानें मृगाला मारण्यांत येऊं नये. एक जागा तयार करून तेथें एक लांकडाचा ओंडा ठेवण्यांत यावा, व रोज एका मृगानें जाऊन त्या ओंड्यावर आपलें डोकें ठेवून तेथें पडून रहावें; आणि राजानें किंवा राजाच्या सूदानें त्याचे डोकें कापून त्याला तेथून घेऊन जावें.''

ही गोष्ट शाखमृगाला पसंत पडली. तेव्हां बोधिसत्त्व त्याला म्हणाला, ''माझा आणि तुझा परिवार सारखाच आहे. अर्थात् एक दिवस माझ्या गणावर पाळी असावी, व एक दिवस तुझ्या गणावर असावी.''

ह्याहि गोष्टीला शाखमृग कबूल झाला; व त्या दिवसापासून आळीपाळीनें एक मृग निश्चित ठिकाणीं पाठविण्याचें ठरलें. दुसर्‍या दिवशीं राजा मृगाला मारण्याकरितां तेथें आला असतां अभयदान मिळालेले हे दोघे मृग पुढें सरसावून राजाला म्हणाले, ''महाराज, आपणाला रोज एकाच मृगाचें मांस लागतें, पण त्याच्यासाठीं आमच्या गणांतील पुष्कळ मृग नाश पावतात. एवढ्यासाठीं आजपासून आमच्यावर मेहेरबानी करून आपण एक स्थान निश्चित करा. आमच्यापैकी रोज एक मृग त्या ठिकाणी जाऊन तेथें ठेवलेल्या ओंड्यावर आपलें डोकें ठेवून पडून राहील. त्याला आपण एका घावानें ठार मारून तेथून घेऊन जावें. म्हणजे आजकाल बाणाच्या प्रहारानें जे पुष्कळ मृग घायाळ होतात, ते व्हावयाचे नाहींत; व आपणाला मृगामागें चहूंकडे धांवण्याचेहि श्रम पडावयाचे नाहींत.''

राजानें त्या मृगांची विनंति मान्य करून त्यांच्या सांगण्याप्रमाणें एक स्थान तयार केलें; व त्या दिवसापासून त्या ठिकाणीं ठेवलेल्या ओंड्यावर डोकें ठेवून निजलेल्या मृगालाच मारून आणावें असा त्यानें आपल्या स्वयंपाक्याला हुकूम केला. कांहीं काळपर्यंत ही व्यवस्था सुरळीत चालली होती.जा

एके दिवशीं शाखमृगाच्या अनुयायांपैकी एका गर्भिणी मृगीवर त्या ठिकाणीं जाण्याची पाळी आली. तेव्हां ही शाखाला म्हणाली ''महाराज, आजची माझी पाळी दुसर्‍या कोणत्या तरी मृगाला द्या. मी सांप्रत गार्भिणी आहे; आणि प्रसूत झाल्यावर माझें लेकरूं व मी अशीं दोघेंहि पाळीवर जाऊं.''

शाख म्हणाला. ''बाई असें करण्याचा मला अधिकार पोंचत नाहीं. ज्याच्यावर पाळी आली असेल त्यानेंच त्या ठिकाणीं गेलें पाहिजे. मी जर अन्यायानें वागूं लागलों तर आमच्या समाजांत मोठी अव्यवस्था होईल. तेव्हां मला तुझ्या विनंतीला मान देतां येत नाहीं.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel