द्वैपायन म्हणाला, ''श्रद्धापूर्वक घरांतून निघून ॠषिवेष स्वीकारिला आणि तो सोडून देऊन पुनः गृहस्थाश्रम केला असें म्हणून लोक माझी निंदा करतील, याचें चित्त चंचल आहे असें ते म्हणतील. या लोकापवादाच्या भयानें आज पन्नास वर्षे इच्छा नसतांना देखिल मी ब्रह्मचर्याचें पालन करीत आहें. पण मला हें सांग कीं, तुला आम्ही सर्वजन मोठा दाता असें समजतों. तूं इच्छां नसतांना दान देत आहेस ही गोष्ट मला केवळ तुझ्या या सत्यक्रियेवरून कळून आली. आतां तुला मी असें विचारतों कीं, मनांत नसून दान देण्यापासून तुला काय फायदा आहे ?''

मांडव्य म्हणाला, ''भो ॠषि, माझ्या पूर्वजांनी याचकाचा मनोभंग कधींहि केला नाहीं. आमचें घर म्हटलें म्हणजे दिनानाथांची पाणपोईच आहे असें गणलें जात असे. आणि हें कुलव्रत जर मी सोडून दिलें असतें तर लोकांनीं मला कुलांगार असें म्हटलें असतें. या लोकापवादाच्या भयानें मनांत नसतांना देखिल मी आजपर्यंत वरपांगी मोठ्या खुषीनें दान देत आलों.''

तो आपल्या पत्‍नीकडे वळून म्हणाला, ''पण भद्रे, तुझें माझ्यावर अत्यंत प्रेम आहे असें मी समजत होतों. तुझ्या अप्रीतीबद्दल मला कधींहि शंका आली नाहीं. इतकीं वर्षे तूं मनांतून माझा द्वेष करीत असतां वरपांगीं माझ्यावर निस्सीम प्रेम कां दाखविलेंस ?'' ती म्हणाली, ''मी जर पत्निधर्मानें वागलें नसतें तर उभयकुळाला बट्टा लागला असता. आणि तेणेंकरून लोकांनीं मला नावें ठेविलीं असतीं. या लोकापवादाच्या भयानें तुमच्यावर प्रेम नसतांहि मी तुमच्या सेवेंत अंतर पडूं दिलें नाहीं.

एवढा संवाद झाल्यावर मांडव्य द्वैपायनाला म्हणाला, ''आपण नाखुषीनें ब्रह्मचर्य आचरण करितां हें ठिक नाहीं. आम्ही दाते लोक आपणाला सत्पुरुष समजून दान देत असतों. परंतु आपलें अंतःकरण जर शुद्ध नाहीं तर आमच्या दानापासून आम्हांला काय फलप्राप्ति होणार आहे ?''

द्वैपायनानें आपली चूक कबूल केली आणि तो मांडव्याला म्हणाला, मित्रा, नाखुशीनें दान देण्यांत तुझीहि पण मोठी चूक होत आहे. मनांत नसून जें सत्कर्म आम्हीं करतों त्यापासून व्हावी तशी फलप्राप्ती होत नाहीं. आतां यापुढें तरी मनःपूर्वक दानधर्म करीत जा.'' त्याजप्रमाणें द्वैपायनानें मांडव्याच्या पत्‍नीलाहि सदुपदेश केला आणि त्या दिवसापासून तीं सर्वजणें आपापले धर्म मनःपूर्वक पाळूं लागलीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel