४४. कोणत्याही प्रकारच्या शिक्षणानें मूर्ख शहाणा होऊं शकत नाहीं.

(नंगलीस जातक नं. १२३)


दुसर्‍या एका जन्मीं बोधिसत्त्व ब्राह्मणकुलांत जन्मला होता. वयांत आल्यावर तक्षशिला नगरीस जाऊन त्यानें सर्व शास्त्राचें अध्ययन केलें व पुनः वाराणसीला येऊन तेथें आपल्या सद्गुणांनीं उत्तम आचार्यांत आपली गणना करून घेतली. त्याच्यापाशीं शिकण्यास्तव पुष्कळ शिष्य रहात असत. त्यांत एक शिष्य आपल्या गुरूच्या सेवेंत अत्यंत तत्पर असे; परंतु जडत्वामुळें शास्त्राध्ययनांत त्याचें पाऊल पुढें पडत नसे. एके दिवशी आचार्यानें जेवल्यानंतर त्याला आपली पाठ दाबण्यास सांगितली. तें काम आटपून तो जाण्यास निघाला असतां बोधिसत्त्व त्याला म्हणाला, ''बाळा या खाटेचे पाय वरखालीं झाल्यामुळें ती डळमळते. तेव्हां एका पायाला कांहीं तरी टेका देऊन मग जा.'' शिष्याला दुसरा कांहीं टेका न सांपडल्यामुळें खाटेच्या पायाला मांडीचा टेका देऊन त्यानें सर्व रात्र तेथेंच काढिली. सकाळीं जेव्हां आचार्याला ही गोष्ट समजली तेव्हां त्याच्या मनाला ती फार लागली. ''हा माझा विद्यार्थी माझ्यावर अत्यंत प्रेम करीत असून माझ्याकडून याचें कांहींच हित होत नाहीं. इतर विद्यार्थी पुढें पुढें जात असून याला अगदीं आरंभीचे पाठ देखील येत नाहींत. याला शिकवण्याला कांहीतरी मार्ग सांपडेल काय ?'' अशा विचारांत बोधिसत्त्व निमग्न होऊन गेला. व त्यानें मोठ्या कष्टानें एक युक्ति शोधून काढली.

दुसर्‍या दिवशीं त्या विद्यार्थ्याला जवळ बोलावून बोधिसत्त्व म्हणाला, ''बाबारे, तुला शिकविण्यासाठीं मी एक नवीन युक्ति शोधून काढिली आहे. आजपासून तूं तुझा धडा तयार नाहीं केला तरी हरकत नाहीं. परंतु जेथें जाशील व एखादी नवी वस्तू पाहशील तेथें तेथें त्या वस्तूसंबंधानें नीट विचार कर, व घरीं आल्यावर मी प्रश्न विचारिला असतां तिचें नीट वर्णन कर.''

त्याच दिवशीं दुपारीं तो विद्यार्थी वनांत गेला असतां त्याला एक साप आढळला. घरीं आल्यावर त्यानें हें वर्तमान आपल्या गुरूस कळविलें. तेव्हां आचार्य म्हणाला, ''तो साप कसा होता ? एखादी उपमा देऊन त्याचें वर्णन कर.'' शिष्य म्हणाला, ''तो नांगराच्या इसाडासारखा होता.'' आचार्याला शिष्यानें केलेल्या उपमेनें फार आनंद झाला. साप नांगराच्या इसाडासारखा असावयाचा तेव्हां शिष्याची अवलोकनशक्ति हळुहळु वृध्दिंगत होत जाईल अशी गुरूला बळकट आशा वाटूं लागली.

कांहीं कालानें शिष्याला अरण्यांत फिरत असतां एक हत्ती आढळला. त्यानें ताबडतोब गुरूला ही गोष्ट सांगितली. तेव्हां गुरूनें हत्ती कसा असतो असा प्रश्न केला. शिष्यानें रोकडा जबाब दिला की, नांगराच्या इसाडासारखा. बोधिसत्त्वाला वाटलें कीं, हत्तीची सोंड नांगराच्या इसाडासारखी असते; परंतु मंदबुद्धिमुळें यानें सर्वच हत्ती नांगराच्या इसाडासारखा असतो अशी उपमा केली असावी. विचार करिता करितां हा सुधारल्यावांचून रहाणार नाहीं.

शिष्यानें आपल्या सहाध्यायांबरोबर दुसर्‍या दिवशीं एक ऊंस खाल्ला व घरी जाऊन ही गोष्ट आपल्या गुरूला सांगितली. बोधिसत्त्वानें ऊंस कसा असतो असा प्रश्न केल्यावर शिष्यानें नांगराच्या इसाडासारखा असतो, असा आपला ठरीव जबाब दिला. उंसाचें आणि नांगराच्या इसाडाचें थोडेसें साम्य आहे असें जाणून बोधिसत्त्व कांहीं न बोलतां उगाच राहिला.

एके दिवशीं त्या शिष्याला आणि त्याच्या कांहीं सहाध्यायांला एका घरीं आमंत्रण होतें. त्या गृहस्थानें त्याला दूध, दही वगैरे पदार्थ यथेच्छ खाऊं घातले. शिष्यानें ती गोष्ट घरीं येऊन आपल्या गुरूला निवेदन केली. दूध, दहीं कसें असतें असा प्रश्न विचारिल्यावर नांगराच्या इसाडासारखें, असा त्यानें कायमचा जबाब दिला, तेव्हां आमच्या बोधिसत्त्वाची त्याच्या शिक्षणाबद्दल पूर्ण निराशा झाली. तो म्हणाला, ''आजपर्यंत मला याची बुद्धि वृध्दिंगत होईल अशी थोडीबहुत आशा वाटत होती पण या मूर्खाला दहीं, दूध आणि नांगराचें इसाड याची सांगड घालण्याला मुळींत दिक्कत वाटत नाहीं ! जणूं काय नांगराच्या इसाडाची उपमा यानें कायमचीच बनवून ठेवली आहे !''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel