ती मृगी मोठ्या कष्टी अंतःकरणानें न्यग्रोधमृगाजवळ गेली, व त्याला म्हणाली, ''महाराज, मी शाखमृगाच्या परिवारापैकीं एक गर्भिणी मृगी आहे. आज राजाच्या अन्नासाठीं देह अर्पण करण्याची माझ्यावर पाळी आली आहे. पाळी दुसर्‍याला देऊन सध्यां मला मोकळें करावें, अशी मी आमच्या पुढार्‍याला विनंति केली; परंतु त्यानें ती फेंटाळून लाविली. आतं जर आपल्या मंडळीपैकी माझ्याऐवजीं एकादा मृग पाठविण्याची मेहेनबानी कराल तर पुढें प्रसूत झाल्यावर तुमच्या समाजावर पाळी येईल त्यावेळीं मी व माझें लेकरूं त्या पाळीचा आनंदानें स्वीकार करूं.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''बाई, तूं कांहीं काळजी करूं नको. मी तुझ्या पाळीची व्यवस्था करतों. तूं चारा खाऊन आणि पाणी पिऊन आनंदानें रहा.''

त्या दिवशीं राजाचा स्वयंपाकी त्या ठिकाणी येऊन पाहतो, तों अभयदान मिळालेला न्यग्रोधमृगच त्या ओंड्यावर डोकें ठेवून पडला होता. तें आश्चर्य पाहून तो तसाच धांवत राजापाशीं गेला आणि म्हणाला, ''महाराज, आज मी मृगाला मारून आणण्यासाठीं रोजच्या ठिकाणी गेलों होतों. तेथें आपण अभयदान दिलेल्या दोन नायक मृगांपैकीं एक जण त्या ओंड्यावर डोकें ठेवून पडलेला आहे ! परंतु आपल्या हुकूमावांचून त्याला मला कसा हात लावतां येईल ? म्हणून मी तसाच धांवत येथें आलों आहे, आतां आपला हुकूम होईल त्याप्रमाणें करण्यांत येईल.''

राजा त्या स्वयंपाक्याबरोबर स्वतः त्या ठिकाणीं गेला, आणि ओंड्यावर डोकें ठेऊन निजलेल्या न्यग्रोधमृगाला म्हणाला, ''मित्रा, मृगराजा, तुला मी अभयदान दिलें असतां तूं या ठिकाणी येऊन कां निजलास ?''

''महाराज, मी मृगसंघाचा नायक असल्यामुळें माझ्यावर पाळी येण्याचा संभव नाहीं. परंतु शाखाच्या परिवारापैकी एका गार्भिणी मृगीवर पाळी आली होती. तिनें ती दुसर्‍या मृगाला देण्याची मला विनंती केली. परंतु एकाचें मरण मी दुसर्‍याला कसे द्यावें ? तेव्हां तिची पाळी माझ्यावर घेऊन मी येथें पडलों आहे. मला मारिलें असतां आपल्या वचनाचा भंग होईल अशी शंका धरूं नका. कां कीं मीं मजसाठीं मरत नसून गार्भिणी मृगीसाठीं मरण्यास सिद्ध झालों आहें.''

राजा म्हणाला, ''मी त्या गर्भिणी मृगीलाहि अभय देतों. तूं आतां या ओंड्यावरून ऊठ.''

''पण महाराज, इतर मृगांची वाट काय ? गर्भिणी मृगीची पाळी मी घेतली व त्यामुळें तिला अभयदान मिळालें, ही बातमी मृगसंघाला लागल्याबरोबर प्रत्येक मृग आपली पाळी चुकविण्यासाठीं मला विनंती करील; व त्या योगें मला वारंवार येथें येऊन आपणाला तसदी द्यावी लागेल ! त्यापेक्षां आपण आजच मला मारावें हें बरें !''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel