एके दिवशीं राजा उद्यानक्रीडेसाठीं आपल्या आम्रवनांत गेला होता. तेथें आंब्याच्या झाडाच्या अग्रशाखेवर एक आंबा पिकला होता. तो काठीनें किंवा दगडानें खालीं पाडणें शक्य नव्हतें. कां कीं, तें झाड फार उंच होतें आणि त्याच्या शाखांतून हा पिकलेला आंबा तेवढा दिसत होता. तेव्हां राजानें सर्व धनुर्ग्राहकांना बाण मारून तो आंबा खालीं पाडण्यास सांगितलें. परंतु त्यांतील एकजणदेखील नीट शरसंधान करून आंबा पाडूं शकला नाहीं. नंतर बोधिसत्त्वाला हें काम सांगितलें. त्यानें अचूक बाण मारून आंबा आणि बाण दोन्ही वरच्यावर झेलून धरले. तें आश्चर्य पाहून राजानें बोधिसत्त्वाचा फार गौरव केला; आणि त्यामुळें त्याची कीर्ति देशोंदेशीं पसरली.

इकडे असदृशकुमार वाराणसी सोडून दुसरीकडे गेला असें जाणून आसपासचे सात लहान लहान राजे एकवटून वाराणसीवर चाल करून आले. वाराणसींत बोधिसत्त्वासारखा शूर शिपाई आणि दूरदर्शी मुत्सदी नाहीं. तेव्हां आपण क्षणार्धांत ब्रह्मदत्ताला शरण आणूं व त्याच्याकडून भरपूर खंडणीं घेऊं असें त्यास वाटलें होतें. परंतु वाराणसींचा कोट फारच बळकट असल्यामुळें त्यांच्या मनोरथाप्रमाणें एकदम तें शहर जिंकतां आलें नाहीं. तेव्हां शहराला वेढा घालून ते तेथेंच राहिले. ब्रह्मदत्तावर हें मोठेंच संकट कोसळलें. आतां त्याला वडील बंधूची आठवण झाली. तो आपल्या हांजी हांजी करणार्‍या नोकरांना म्हणाला, ''तुम्ही खोटें नाटें सांगून माझ्या वडील बंधूला येथून घालवून दिलेंत. परंतु तो जर येथें असता तर आज आम्हांला या संकटापासून रक्षण करिता. आतां देखील आपण त्याजपाशीं एक गुप्‍त हेर पाठवूं. आमच्यावर आलेले संकट त्याला समजलें, तर माझे अपराध पोटीं घालून आमच्या मदतीला तो धांवत आल्यावांचून रहाणार नाहीं. त्याचें बंधुप्रेम इतकें अलौकिक आहे कीं, माझ्यासारख्या कृतघ्न भावाच्या दुर्वर्तनानें तें मलिन होणार नाहीं.''

ब्रह्मदत्तानें गुप्‍त हेर पाठवून वाराणसीच्या वेढ्याचें वर्तमान कळवल्याबरोबर बोधिसत्त्व आपल्या धन्याचे कांहीं निवडक योध्दे बरोबर घेऊन वाराणसीला आला. मी असदृशकुमार आपल्या भावाला मदत करण्यासाठीं आलों आहे अशा तर्‍हेचा मजकूर लिहून तीं पत्रें बाणाला बांधून त्यानें शत्रुसेनेच्या मध्यभागीं पाडलीं. बोधिसत्त्वाचें नांव ऐकिल्याबरोबर त्या सात राजांची सेना फार गडबडून गेली; आणि जो तो जिकडे वाट सांपडेल तिकडे पळूं लागला ! एका तासाच्या आंत वाराणसी शहराचा वेढा उठला व मोठ्या जयजयकारानें बोधिसत्त्वानें शहरांत प्रवेश केला. ब्रह्मदत्तानें पुढें येऊन त्याचे पाय घट्ट धरले, आणि केलेल्या अपराधाची क्षमा मागितली. तेव्हां बोधिसत्त्व म्हणाला, ''तुझ्या दुष्ट सोबत्यांनी तुझें मन बिघडविलें असलें तथापि तूं माझा भाऊ आहेस; आणि म्हणून तुझ्यावरचें माझें प्रेम कधींहि कमी झालें नाहीं. लुच्च्या लोकांच्या तूं नादास लागलास हें पाहून मला मात्र फार वाईट वाटलें. पण आतां तुला वाईट संगतीचें फळ कोणतें हें पक्के समजून चुकलें आहे, व ह्या पुढें तुझ्या हातून पुन्हां अयोग्य गोष्ट होणार नाहीं अशी मला आशा आहे.''

ब्रह्मदत्तानें आपल्या वडील भावाला मोठ्या आग्रहानें आपल्याजवळ ठेवून घेतलें, आणि तेव्हांपासून त्याच्या सदुपदेशाबाहेर आजन्म पाऊल टाकलें नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel