बरेच दिवस शेतकरी कोणत्या तरी निमित्तानें वाराणसीला येईल व थोरल्या घोडेस्वाराची चौकशी करील अशी राजास आशा वाटत होती. परंतु वर्ष दोन वर्षे शेतकरी वाराणसीला मुळींच गेला नाहीं. कां कीं, त्याचें कोणाशींहि भांडण नसल्यामुळें सरकार दरबारांत जाण्याचा त्यावर प्रसंग नसे, आणि आपलें शेताचें काम सोडून उगाच चैनीसाठीं वाराणसीसारख्या दूरच्या शहरीं जाणें त्याला मुळींच आवडत नसे. त्याला आपल्यापाशीं आणण्याचा राजानें असा एक उपाय योजिला कीं, त्याच्या गांवावर एकदम दुप्पट कर वाढविला, तरी शेतकरी येईना. तेव्हां आणखीहि कर वाढविण्यांत आला. गांवांतील शेतकरी गोळा होऊन या शेतकर्‍याला म्हणाले, ''आसपासच्या गांवावर मूळचाच कर असून आमच्याच गांवावर एकसारखा कर वाढत आहे; याला तूंच कारण आहेस. तो घोडेस्वार आला कीं नाहीं, तो राजाचा नोकर होता कीं शत्रु होता हें आम्हाला काय माहीत. आणि त्याला जर आम्ही आमच्या गांवीं आश्रय दिला नसता, तर आज आमच्यावर हा प्रसंग ओढवला नसता. आतां वाडवडिलांनीं वसवलेला हा गांव सोडून मुलाबाळांना घेऊन दुसर्‍या कोठें तरी जाण्याची आमच्यावर पाळी येऊन राहिली आहे.''

त्यावर शेतकर्‍यानें उत्तर दिलें, ''गडे हो, त्याच्या चेहर्‍यावरून तो घोडेस्वार लुच्चा नव्हता असें मी खात्रीनें सांगू शकतों. राजाची कांहीं तरी गैरसमजूत होऊन हा घोटाळा उपस्थित झाला असावा. आतां मी वाराणसीला जाऊन त्या घोडेस्वाराला भेटतों आणि आम्हा सर्वांची राजाच्या दरबारीं दाद लागेल अशी खटपट करतों. पण त्याला कांहीं भेट घेऊन जाणें इष्ट आहे. माझ्या घरीं मी कांहीं खाण्यापिण्याचे पदार्थ तयार करतों; परंतु गांवांतून वर्गणी गोळा करून त्याच्यासाठीं एक धोतरजोडा आणि त्याच्या बायकोसाठीं एक लुगडें घेऊन द्या. म्हणजे मी ताबडतोब वाराणसीला निघतों.

गांवकर्‍यांनीं दुसर्‍याच दिवशी एक गांवठी धोतरजोडा आणि लुगडें त्याच्या स्वाधीन केलें आणि तो त्याच दिवशीं वाराणसीस जाण्यास निघाला.

अनुक्रमें वाराणसीच्या वेशीवर येऊन पोहोंचल्यावर तेथील नगररक्षकापाशीं त्यानें थोरल्या घोडेस्वाराची चौकशी केली. जमादारानें राजाज्ञेप्रमाणें त्याला ताबडतोब नेऊन उभे केलें. शेतकर्‍याला राजासमोरगेल्यावर अद्यापि हा गृहस्थ राजा आहे, ही गोष्ट माहीत नव्हती. त्याला पाहिल्याबरोबर राजानें आसनावरून खाली उतरून आलिंगन दिलें, आणि राणीकडून पाणी मागवून त्याचे पाय आपण स्वतः धुतले; व त्याला सुग्रास भोजन खावयास घालून मोठ्या पलंगावर आणि उत्तम बिछान्यावर निजविलें. थोडी विश्रांति घेऊन उठल्यावर शेतकर्‍यानें आपल्या पडशींतून खाऊ, धोतरजोडा आणि लुगडें बाहेर काढिलें; आणि तो राजाला म्हणाला, ''मित्रा हा धोतरजोडा तुझ्यासाठीं आणला आहे; हें लुगडें तुझ्या बायकोसाठीं आणि हा खाऊ तुझ्या मुलांसाठी आहे.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel