पिलिय म्हणाला, ''पण तुम्हाला उतरण्याला जागा मिळाली कीं नाहीं ? जेवण वगैरे झालें आहे कीं नाहीं ? आमच्या येथें सध्यां फार अडचण आहे. तेव्हां मला तुमची सोय करतां यावयाची नाहीं आणि तुम्हाला हेंहि समजलें पाहिजे कीं येथें कोणी तुम्हाला आश्रय देईल असें मला वाटत नाहीं.''

बिचारा शंखश्रेष्ठी इतका ओशाळला कीं, त्याच्या तोंडांतून शब्द फुटेना. ज्याच्यावर एवढा मोठा उपकार करून फार वर्षे लोटलीं नाहींत त्याच्याच तोंडून असे उद्‍गार निघावेत हें पाहून तो अगदींच गोंधळून गेला, तथापि, भुकेची पीडा फार कठीण आहे असें म्हणतात तें कांहीं खोटें नाहीं. त्याला भूक लागली होतीच पण तेवढ्यानें कदाचित् त्यानें याचना केली नसती परंतु त्याची साध्वी स्त्री उपाशी होती, व तिची आठवण झाल्याबरोबर त्याचें चित्त थार्‍यावर येऊन तो पिलियाला म्हणाला, ''आम्हाला आपल्या घरी आश्रय मिळत नसला तरी हरकत नाहीं. पण आम्ही दोघींजणें आज सारा दिवस उपाशी आहों तेव्हां आमची दुसरी कांहीं सोय लागेपर्यंत शिधासामग्रीची व्यवस्था होईल तर बरें.''

पिलियाच्या घरीं त्याच दिवशीं हजारों गाड्या भरून भात आलें होतें. भातांतील फोल निराळें काढून तें पेवांत भरून ठेवण्याचें काम चाललें होतें. तो आपल्या एका नोकराला हांक मारून म्हणाला, ''या माणसाला त्या फोलांतून एक पायली भरून द्या.''

नोकरानें त्याच्या आज्ञेप्रमाणें एक पायली फोल शंखश्रेष्ठीच्या पदरांत टाकलें. शंखश्रेष्ठी तें घेऊन मुकाट्यानें धर्मशाळेकडे चालता झाला. त्याची बायको आपला पति मोठ्या थाटमाटानें परत येईल अशा मनोराज्यानें वाट पहात राहिली होती. पण शंखश्रेष्ठीला पायींच परत आलेला पाहून तिला फार विषाद झाला. तरी त्याच्या पाठीवर गाठोडें पाहून तिला थोडेसें बरें वाटलें. आज जेवणाचें साहित्य मिळण्याची पंचाईत राहिली नाहीं; बर्‍याच दिवसांनीं सुग्रास अन्न खाऊं असें वाटून तिला बरीच हुषारी आली. ती शंखश्रेष्ठीला म्हणाली, ''आर्यपुत्र, तुम्हीं पायींच परत आलां तेव्हां तुमच्या मित्रानें तुमचा योग्य सन्मान केला नसावा; किंवा त्याची तुमची भेट तरी झाली नसावी. कांहीं असो आपणाला आज शिधासामग्री तरी यथास्थित मिळाली पाहिजे असें या तुमच्या गाठोड्यावरून सहज अनुमान करितां येतें.''

शंखश्रेष्ठी म्हणाला, ''भद्रे, हें गांठोडें फोलाचें आहे ! श्रेष्ठीनें माझें प्रत्युपकार चार शेर फोल देऊन फेडले आहेत ! त्याने पुनः आपल्या घरीं येऊं नये असें बजावून सांगितलें आहे. आतां आम्हाला या शहरांत मजुरीवर निर्वाह करावा लागेल असें वाटतें.''

ती म्हणाली, ''मजुरी करण्याला मला लाज किंवा भीति वाटत नाहीं. परंतु त्या कृतघ्न माणसाकडून तुम्ही एक पायली फोल घेऊन आला याची मला फार चीड येते. हें फोल नेऊन पुनः त्याच्या स्वाधीन करा.'' असें बोलून तिनें तें गाठोडें नवर्‍याच्या अंगावर टाकलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel