६६. तरुणाचा उत्साह.

(सुसीम जातक नं. १६३)


प्राचीनकाळीं वाराणसी नगरींत सुसीम नांवाचा राजा राज्य करीत होता. आमचा बोधिसत्त्व त्या राजाच्या पुरोहिताच्या स्त्रीच्या पोटीं जन्मास आला. तो वयांत येण्यापूर्वीच पुरोहित मरण पावला. बोधिसत्त्वाचें अध्ययन संपलें नव्हतें. बाप वारला तेव्हां त्याचें वय सुमारें सोळा सतरा वर्षांचें होतें. इतक्यांत हत्तींचा सण आला.

हत्तीचा सण म्हणजे त्या दिवशीं हत्तींना घालण्यासाठीं सरदार मानकरी वगैरे लोक नानातर्‍हेचे अलंकार आणीत असत. याशिवाय पुष्कळ वस्तू गोळा करून त्यांनी हत्तींची पूजा करण्यांत येत असे. आणि पूजाविधी आटपल्यावर तें सर्व साहित्य पुरोहिताला मिळे. वाराणसींतील ब्राह्मणांना पुरोहितालाच सर्व द्रव्य मिळावें, ही गोष्ट आवडत नसे. परंतु वहिवाटीविरुद्ध जाण्याचें त्यांना सामर्थ्य नव्हतें. पुरोहित गेल्यावर राजगृहीं जमून ते राजाला म्हणाले ''महाराज, यंदाच्या हत्तीच्या सणांतील सर्व दक्षणा आम्हा सर्वांना मिळाली पाहिजे. कां कीं, पुरोहिताचा मुलगा तरुण असून तो सर्व वेदांत आणि हस्तिसूत्रांत निष्णात नाहीं. तेव्हां जुनी वहिवाट मोडून सर्व ब्राह्मणांला या दक्षिणेंचे वाटेकरी करावें, अशी आमची विनंति आहे.''

राजाला ही गोष्ट पसंत पडली. व पुढें येणार्‍या हत्तीच्या सणांतील दक्षिणा सर्व ब्राह्मणांस मिळावी, असा त्यानें निकाला दिला. ही गोष्ट बोधिसत्त्वाच्या आईला समजली, तेव्हां अत्यंत खिन्न होऊन तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहूं लागल्या. बोधिसत्त्व अध्ययन करून घरीं येऊन पाहतो तों आपली आई शोकमय झालेली त्याला दिसली तेव्हां तो आईला म्हणाला, ''तुझ्या शोकाचें कारण काय तें मला सांग. तूं जर शोक सोडून दिला नाहींस तर मी अन्नग्रहण करणार नाहीं.''

आई म्हणाली, ''बाळा आज माझ्या कानीं एक वाईट बातमी आल्यामुळें माझें मन उद्विग्न झालें आहे. तूं तरुण आहेस अशी संधी साधून गांवांतील ब्राह्मणांनीं आमच्या कुल परंपरेचा हक्क नष्ट करण्याचा खटाटोप चालविला आहे. आणि आमच्या राजानेंहि त्यांच्या प्रयत्‍नांस आपल्या आज्ञेनें यश दिलें आहे. हत्तीच्या सणांतील सर्व वस्त्रालंकार तुझ्या वाडवडिलांना मिळत असत. परंतु आतां तूं लहान आहेस, व तुझें अध्ययन पुरें झालें नाहीं अशा सबबीवर आमच्या कुलाचा हक्क काढून घेऊन तो वाराणसींतील सर्व ब्राह्मणांला देण्यांत येणार आहे. आम्हांला द्रव्यप्राप्ती होणार नाहीं, याजबद्दल मुळींच वाईट वाटत नाहीं. आमच्या घरीं पुष्कळ धन आहे आणि एवढें धन येऊन तरी ब्राह्मणाला काय करावयाचें आहे ? तथापि संधी साधून इतर ब्राह्मण आमच्या कुलाचा हक्क बुडवूं पहात आहेत याचेंच मला राहून राहून वाईट वाटत आहे.''

हें आपल्या मातोश्रीचें भाषण ऐकून बोधिसत्त्वाचें प्रसुप्‍त तेज एकदम जागृत झालें. तो म्हणाला, ''आई, आजपर्यंत मी मोठ्या उत्साहानें मुळींच अध्ययन केलें नाहीं. आमच्या घरीं पुष्कळ संपत्ती आहे. आणखी पुष्कळ अध्ययन करून काय करावयाचें अशा वेडगळ समजुतीनें माझें चित्त अध्ययनापेक्षां क्रीडेकडे जास्त लागलें; पण आतां तुला दुःख झालेलें पाहून मला संवेग उत्पन्न झाला आहे आणि हत्तीचा सण येण्यापूर्वी माझें अध्ययन पुरें करण्याचा मी दृढनिश्चय केला आहे. आतां तूं मला एवढेंच सांग कीं, सर्व वेदांत आणि शास्त्रांत पारंगत असा गुरू कोठें सांपडेल ?''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel