हा निकाल ऐकल्याबरोबर गोफणींतून सुटलेल्या दगडाप्रमाणें अवदसा सूं करून झटदिशीं खालीं उतरली, आणि श्रेष्ठी बसला होता त्या खोलींत खिडकीवाटें शिरून अंतराळीं उभी राहिली. तिला पाहून श्रेष्ठी म्हणाला, ''तूं नीलवर्णाच्या रश्मी अंगांतून सोडणारी व नीलवस्त्र परिधान करणारी नीलवर्णी स्त्री कोण आहेस बरें ?''

अवदसा म्हणाली, ''विरूपाक्ष दिग्पाळाची मी कन्या आहें. मला काली किंवा अवदसा असें म्हणतात. केवळ तुझ्या घरीं थोडावेळ विश्रांति घेण्यासाठीं अवकाश मिळावा म्हणून आलें आहें.''

शुचिपरिवार श्रेष्ठी म्हणाला, ''परंतु मला एवढें सांग कीं, तुला कशा प्रकारच्या मनुष्याच्या घरीं राहणें आवडतें ?''

अवदसा म्हणाली, ''परनिंदक, विनाकारण स्पर्धा करणारा, मत्सरी आणि शठ अशा मनुष्यावर माझें फार प्रेम असतें. कां कीं, तो जें जें मिळवितो तें तो लवकरच घालवितो. वारंवार रागावणारा, दीर्घद्वेषी, चहाडखोर, भांडणें उपस्थित करणारा, खोटें बोलणारा आणि शिवीगाळी करणारा अशा मनुष्यावर माझी फार फार भक्ति असते. आज उद्यां असें म्हणून जो आपलें काम लांबणीवर टाकतो. बरें, काम करण्याची कोणी आठवण दिली तर त्यावर रागावतो आणि आपल्या हिताच्या गोष्टीची अवहेलना करितो असा गर्विष्ठ मनुष्य आपल्या सर्व मित्रांपासून भ्रष्ट होतो, आणि म्हणूनच तो मला फार आवडतो. अशा मनुष्याच्या घरीं मीं सुखानें वास करितें.''

शुचिपरिवार म्हणाला, ''बाई काली, माझ्या अंगीं किंवा माझ्या कुटुंबाच्या अंगीं असे गुण नाहीं आहेत. तेव्हां येथें तुला आश्रय मिळणें शक्य नाहीं. तूं दुसर्‍या शहरांत किंवा राजधानींत निवासस्थान पहा.''

अवदसा म्हणाली, ''आपल्या या बोलण्यानें माझी फारच निराशा झाली आहे. जेथें संपत्ति फार असते तेथें माझी अशी निराशा कधींहि झालीं नाहीं. एकदां मनुष्याच्या घरीं धनदौलत आली म्हणजे माझ्या आवडीचे सर्व गुण एका मागून एक त्याच्या अंगीं शिरतात, व माझी त्याच्या घरीं फेरी होऊन यथेच्छ चैन चालते.''

असें बोलून काली तेथून निघून गेली. इतक्यांत श्री देवता तेथें येऊन उभी राहिली. तिला पाहून श्रेष्ठी म्हणाला, ''असा हा दिव्यवर्णधारिणी स्त्री तूं कोण आहेस ? तुझ्या अंगांतून निघणारीं पीतवर्ण किरणें पाहून मला विस्मय होत आहे. तेव्हां तुझी प्रवृत्ति मला सांग.''

लक्ष्मी म्हणाली, ''धृतराष्ट्र दिग्पाळाची मी कन्या आहे, आणि मला श्री किंवा लक्ष्मी असें म्हणत असतात. थोडका वेळ विश्रांति घेण्यासाठीं मी आपल्या घरीं आलें आहें. आपण आश्रय द्याल तर मी आभारी होईन.''

श्रेष्ठी म्हणाला, ''पण तूं कशा प्रकारच्या माणसाच्या घरीं रहातेस तें मला सांग. म्हणजे तुझ्या योग्यायोग्यतेचा विचार करून आश्रयस्थान देईन.''

लक्ष्मी म्हणाली, ''शीत आणि उष्ण, वारा आणि पाऊस, आणि डांस साप वगैरे त्रासदायक प्राणी यांची जो पर्वा करीत नाहीं, भूक आणि तहान सहन करून आपल्या कर्तव्यांत जो सर्वदा दक्ष असतो, व वेळोवेळीं आपलीं कामें करुन हानि होऊं देत नाहीं, तो मनुष्य मला प्रिय आहे. त्याच्या घरीं रहाणें मला फार आवडतें. जो क्रोधवश होत नाही, मित्रांवर प्रेम करितो, दानधर्म करितो, शीलसंपन्न असतो, दुसर्‍याला ठकवीत नाहीं, सरळपणानें वागतो, लोकांना मदत करितो, व मृदु भाषणानें त्यांना वश करितो, आणि मोठ्या पदवीला चढला तरी नम्रता सोडीत नाही, अशा मनुष्याच्या घरीं मला फारच आनंद होतो. जो मित्रांवर, अमित्रांवर, थोरांवर, लहानांवर आणि समानांवर, हित करणार्‍यांवर आणि अहित करणार्‍यांवर, एकांतांत किंवा लोकांतांत सारखेंच प्रेम करितो, व त्यांचें हित करण्यास दक्ष असतो, कधीं कोणाला दुखवून बोलत नाहीं, त्यावर मी जिवंतपणीं प्रसन्न असतेंच. परंतु तो मेल्यावर देखील त्याच्यावरची माझी मर्जी कमी होत नाहीं. सत्कार संपत्ति, थोरवी इत्यादिकांच्या लाभानें ज्याला गर्व चढतो अशा मूर्खाला मी पायखान्याप्रमाणें अल्पावधींतच सोडून जात्यें.''

हें श्री देवतेचें भाषण ऐकून श्रेष्ठी म्हणाला, ''तरी मग श्री देवतेची किंवा अवदसेची मर्जी संपादन करणें हें ज्याच्या त्याच्या हातीं आहे असें म्हटलें पाहिजे. सामान्य लोकांत अशी समजूत आहे कीं, लक्ष्मीची किंवा अवदसेची फेरी अपोआप होत असते. त्याला कांहीं प्रयत्‍न करावा लागत नाहीं. माझी समजूत या विरुद्धच होती, आणि तुझ्या भाषणानें ती आज दृढतच झाली आहे. आतां माझ्या घरीं हा नवीन मंचक आणि बिछाना तयार आहे. त्यावर तूं सुखानें विश्रांती घे.'' लक्ष्मीनें तेथें विश्रांती घेऊन कालीची भेट घेतली, आणि अनवतप्‍त सरोवरांत प्रथम स्थान करण्याचा आपला हक्क शाबीत केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel