हत्ती चिमणीच्या बोलण्याकडे लक्ष न देतां तिची कुचेष्टा करीत तेथून पुढें गेला. चिमणी रात्रंदिवस हत्तीचा सूड कसा उगवावा या विवंचनेत पडली होती. इतक्यांत एका मेलेल्या प्राण्याचे डोळे टोंचून टोंचून खात असलेला कावळा तिच्या पहाण्यात आला. जवळ जाऊन त्याला ती म्हणाली, ''काकराज, या मेलेल्या प्राण्याचे डोळे फोडण्यांत काय पुरुषार्थ आहे ? तुमच्या अंगीं सामर्थ्य असेल तर जिवंत प्राण्यांचे डोळे उपटण्याचा तुम्ही पराक्रम करून दाखवला पाहिजे.''

कावळा म्हणाला, ''बाई ग, हा तुझा निव्वळ वेडेपणा आहे. मेलेले प्राणी आम्हां कावळ्यांचें भक्ष्य आहे. परंतु जिवंत प्राण्याचे डोळे फोडून त्यास अंध करण्यांत कोणता पुरुषार्थ ? चिमणी म्हणाली, ''काकमहाराज, आपण जर विनाकारण दुसर्‍या प्राण्याला अंध केलें तर तें मोठे पाप होय. परंतु दुसर्‍या एका बलाढ्य प्राण्यानें आपला छळ चालविला असतां त्याला अंध बनवणें याला कोणी दोष देऊं शकेल काय ?''

कावळा म्हणाला, ''पण आपण जर दुसर्‍याच्या वाटेला गेलों नाहीं तर दुसरा आपला छळ कां म्हणून करील ?''

चिमणी म्हणाली, ''महाराज, आपण व मी पक्ष्यांच्या जातीचीं आहोंत. मी आपणापेक्षां दुर्बल आहें, आणि म्हणूनच माझी कींव आपणास आली पाहिजे. गेल्या कांहीं दिवसांमागें एका दांडग्या हत्तीनें माझ्या घरट्याचा आणि पोरांचा चुराडा करून टाकिला. माझा कैवार घेऊन या कृत्याचा सूड उगविणें हें तुमचें कर्तव्य नव्हे काय ?''

कावळा म्हणाला, ''हत्तीसारख्या प्रचंड प्राण्याशीं आमचें काय चालणार ?''

चिमणी म्हणाली, ''तेंच मी मघाशीं आपणांस सांगितलें आहे. त्याच्याशीं मल्लयुद्ध करण्याचें आपलें काम नाहीं. तो जेथून जात असेल त्या मार्गांत एखाद्या झाडावर लपून बसून जवळ आला कीं नेमका त्याचा एक डोळा फोडून टाकावयाचा, पुनः दुसर्‍या एका ठिकाणीं दडून बसून दुसर्‍या डोळ्यावर झडप घालून चंचुप्रहारानें तोहि फोडून टाकावयाचा. एवढें केलें म्हणजे त्याला योग्य शिक्षा झाली असें होईल.''

कावळ्यानें चिमणीचें म्हणणें मान्य करुन संधी साधून हत्तीला अंध करून सोडलें. परंतु एवढ्यानें चिमणीचें समाधान झालें नाहीं. ती एका गोमाशीजवळ येऊन तिला आपली हकीगत कळवून म्हणाली, ''या दुष्ट हत्तीच्या फुटलेल्या डोळ्यांत तूं अंडीं घाल.''

गोमाशीनें चिमणीच्या सांगण्याप्रमाणें हत्तीच्या डोळ्यांत अंडीं घातलीं, व त्यामुळें दोन्ही डोळ्यांत किडे होऊन हत्तीच्या डोळ्यांत भयंकर वेदना होऊं लागल्या. तो सैरावैरा अरण्यांत धांवत सुटला. झाडाचा पाला त्याला खावयास मिळे, परंतु पाणी कोठें आहे हें दिसेना. आपल्या घ्राणेंद्रियानें पाण्याचा थांग काढीत तो फिरत होता. इतक्यांत चिमणीनें एका बेडकाची दोस्ती संपादन करुन त्याला अशी विनंती केली कीं, त्यानें जवळच्या टेकडीवर जाऊन मोठ्यानें शब्द करावा. हत्तीला तेथें पाणी असेल असें वाटून हत्ती तेथें आल्यावर पुनः त्यानें एका भयंकर कड्याखालीं उतरून तेथें शब्द करावा. बेडकानें चिमणीचें सांगणें ऐकून टेकडीवर जाऊन ओरडण्यास सुरुवात केली. तेव्हां तो अंध हत्ती पाण्याचा थांग लावण्यासाठीं त्या टेंकडीवर चढला. पुनः बेडूक एका प्रचंड कड्याखालीं उतरून तेथें ओरडला. तेव्हां हत्ती त्या दिशेला चालला असतां कड्यावरून खालीं कोसळला व त्याचीं हाडें मोडून मरणांतिक वेदनांनीं पीडित होऊन तो तेथें पडला. तेव्हां चिमणी त्या ठिकाणीं येऊन त्याला म्हणाली, ''हे द्वाड हत्ती, आतां मी कोण आहे हें पाहण्यास तुझे डोळे राहिले नाहींत. पण तुझे कान शाबूत असल्यामुळें माझ्या शब्दावरून तूं मला ओळखशील. कांहीं दिवसांमागें मदोन्मत्त होऊन ज्या लहानशा प्राण्याचें घरटें पिल्लांसकट तूं पायाखालीं तुडविलेंस तोच प्राणी- तीच चिमणी- मी आहें. तुझा मी पूर्णपणें सूड उगवला आहे. या तुझ्या अधःपतनाला कारण मी झालें आहे.''

असे बोलून तिनें त्याला कसें कड्यावरून खालीं पाडलें हें सर्व इत्थंभूत सांगितलें. तेव्हां हत्ती म्हणाला, ''मी जर आमच्या कळपांत असतों, तर आमच्या गजराजानें अशा प्रकारचें दुराचरण मला करूं दिलें नसतें. परंतु बळमदानें फुगून जाऊन मी माझा कळप सोडून दिला. आणि, त्याच बळाच्या दर्पामुळें मी हालअपेष्टा पावून आतां मृत्यूच्या मुखांत शिरत आहे ! कोणत्याहि प्राण्यानें आपल्या बळाच्या किंवा सत्तेच्या जोरावर क्षुद्र प्राण्याचा उपमर्द करूं नये हें माझ्या गोष्टीपासून शिकण्यासारखें आहे.'' असे उद्‍गार काढून हत्तीनें प्राण सोडला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel