बोधिसत्त्व म्हणाला, ''तुम्ही म्हणतां अशी गोष्ट घडून आली नसती. मी जर त्याला न कळत पुढें जाण्यास निघालों असतों, तर त्याला माझा फार राग आला असता, व त्यामुळें आम्हां दोघांमध्ये भयंकर स्पर्धा जुंपली असती. आतां पुढें जाण्यांत विशेष फायदा आहे, असे तुम्हांस वाटतें; परंतु हेंदेखील ठीक नाहीं. पावसाळ्यामुळें नादुरुस्त झालेले रस्ते पुढें जातांना करावे लागतील; नदीपार जाण्यासाठी उतार शोधून काढावा लागेल; व जंगलांत झरे किंवा विहिरी बुजून गेल्या असतील त्या साफ कराव्या लागतील. जर त्याच्या मालाला चांगली किंमत आली तर एकदां भाव ठरल्यामुळें आम्हालाही त्याच किंमतीनें आमचा माल विकतां येईल. एकंदरीत तो पुढें गेला असतां आम्हाला कोणत्याहि तर्‍हेनें नुकसान नाहीं.''

त्या वेळीं जंबुद्वीपामध्यें पांच प्रकारची अरण्यें असत. ज्या अरण्यांत चोरांची वस्ती असे त्याला चोरकांतार असें म्हणत; जेथें हिंस्त्र पशूंची वस्ती असे त्याला व्यालकांतार म्हणत असत; ज्या ठिकाणीं पिण्यालादेखील पाणी मिळत नसे, त्याला निरुदककांतार म्हणत असत; यक्षराक्षसादिकांची जेथें पीडा असे, त्याला अमनुष्यकांतार असें म्हणत; आणि ज्या ठिकाणी अन्नसामग्री मिळण्याची मारामार पडे त्याला अल्पभक्ष्यकांतार असे म्हणत.

बोधिसत्त्वाच्या मार्गात जे मोठे जंगल होते, तेथे पाण्याचा दुष्काळ असल्यामुळें आणि यक्षांची वस्ती असल्यामुळें त्याला निरुदककांतार आणि अमनुष्यकांतार असें म्हणत. बोधिसत्त्वाच्या साथीदारानें आपल्या लोकांसह ह्या जंगलाजवळ आल्यावर पाण्याची मोठमोठालीं मडकीं भरून गाड्यावर चढविलीं, आणि तो जंगलांतून पार जाऊं लागला. वारा पुढच्या बाजूला असल्यामुळें आपणाला धुळीची बाधा होऊं नये या हेतूनें त्या व्यापार्‍यानें आपली गाडी सर्वांपुढें चालविली होती. एक दोन दिवसांच्या रस्त्यावर गेल्यानंतर उलट दिशेनें एक व्यापारी सफेत बैलाच्या गाडींत बसून आपल्या नोकरांसह येत असलेला त्याच्या पाहण्यांत आला. त्या व्यापार्‍यानें आणि त्याच्या नोकरांनीं स्नान करून गळ्यांत कमलांच्या माळा घातल्या होत्या. त्याला पाहून वाराणसीहून निघालेल्या व्यापारानें आपल्या गाड्या उभ्या करविल्या व आपण खालीं उतरून त्याजजवळ गेला. प्रतिपथानें येणार्‍या त्या गृहस्थानेंहि आपली गाडी उभी केली व तो खालीं उतरून वाराणसीच्या सार्थवाहाला म्हणाला, ''आपण कोठून आलांत व कोणीकडे चाललांत ?''

सार्थवाह म्हणाला, ''मी वाराणसीहून निघून ह्या जंगलाच्या पलीकडील प्रदेशांत व्यापारासाठीं जात आहे.''

गुहस्थ म्हणाला, ''ठीक आहे; पण आपल्या ह्या मागून येणार्‍या गाड्यांवर मोठमोठाली मडकीं दिसताहेत ती कोणत्या पदार्थानें भरलीं आहेत ?''

सार्थवाह म्हणाला, ''हें जंगल निरुदककांतार आहे असें आमच्या ऐकण्यांत आल्यामुळें आम्हीं हीं मडकीं पाण्यानें भरून बरोबर घेतलीं आहेत.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel