११७. वैरानें वैर शमत नाहीं

(दीघीतिकोसल जातक१ नं. ३७१)


प्राचीनकाळीं ब्रह्मदत्त नांवाचा राजा वाराणसींत राज्य करीत होता. त्यानें कोसल देशाचा दीघीती नांवाच्या राजावर मोठ्या सैन्यासहवर्तमान हल्ला केला. तेव्हां दीघीति आपला पराजय खात्रीनें होणार आहे असें जाणून आपल्या पट्टराणीला घेऊन गुप्‍तवेषानें राजधानींतून पळून गेला. ब्रह्मदत्तानें त्याचें राज्य खालसा केलें, व त्याची सर्व धनदौलत लुटून नेली. दीघीति राजा परिव्राजक वेषानें वाराणसीला येऊन एका कुंभाराच्या घरीं राहिला. तेथें त्याची पत्‍नी गरोदर होऊन तिला असे डोहाळे झाले कीं, सूर्योदयाच्या वेळी सन्नद्ध झालेली चंतुरंगिनी सेना पहावी व तलवारी धुवून त्यांचें पाणी प्यावें. परंतु तिला सैन्य दाखवावें कसें, व तलवारीचें पाणी कोठून आणून द्यावें या विवंचनेंत दीघीति पडला. वाराणसी राजाच्या पुरोहिताची आणी त्याची मैत्री होती. एके दिवशीं पुरोहिताला त्यानें बायकोच्या डोहाळ्याची गोष्ट सहज सांगितली. तेव्हां पुरोहित म्हणाला, ''आपल्या पत्‍नीला घेऊन तेथें या. तिला पाहण्याची माझी इच्छा आहे.'' आणि जेव्हां दीघीतीनें आपल्या राणीला तेथें आणलें तेव्हां तिला पाहून पुरोहित उद्‍गारला, ''तिच्या उदरीं भावी कोसल राजा जन्माला येणार आहे !'' आणि तो तिला म्हणाला, ''देवी, तूं आनंदित हो ! तुझे डोहाळे पुरे होतील.''
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१. ही गोष्ट महावग्गांत सांपडते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नंतर पुरोहित ब्रह्मदत्ताजवळ जाऊन त्याला म्हणाला, ''महाराज, उदयीक उत्तम ग्रहयोग आहे. अशा प्रसंगीं आपली सर्व सेना संनद्ध करून सैनिकांनीं एका सुंदर भांड्यांतील पाण्यानें आपल्या तरवारी धुवाव्या अशी आज्ञा करा. त्यायोगें आमच्या राज्याला फार फायदा होईल.''

राजानें पुरोहिताच्या सांगण्याप्रमाणें दुसर्‍या दिवशीं सूर्योदयाच्या वेळीं सर्व व्यवस्था केली व पुरोहितानें दीघीतिच्या राणीला गुप्‍त ठिकाणीं ठेऊन संनद्ध सेना दाखविली, व तलवारी ज्या भांड्यांत धुतल्या होत्या त्यांतील पाणी पाजलें. नवमास पूर्ण झाल्यावर कोसल राज्ञी सुंदर पुत्र प्रसवली. पुरोहित ब्राह्मणाच्या मार्फतीनें त्या मुलाचें शिक्षण उत्तम रीतीनें झालें. तथापि दीघीतीला अशी भीति पडली कीं, जर काशीराजाला आम्ही येथें रहातों असें कळून आलें तर तो एका क्षणांत आम्हा सर्वांचा शिरच्छेद करील. म्हणून आपल्या मुलाला त्यानें पुरोहित ब्राह्मणाच्या ओळखीनें वाराणसी बाहेरील एके खेडेगांवी पाठवून दिलें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel