दीघीतीचा हजाम काशीच्या राजाच्या आश्रयास येऊन राहिला होता. त्यानें आपल्या नव्या धन्याची मर्जी संपादण्यासाठीं दीघीती वाराणसींत अज्ञात वेषानें राहतो अशी चुगली केली. राजानें ताबडतोब दीघीतीला आणि त्याच्या राणीला पकडून आणिलें व शहरातून त्यांची धिंड काढून नगराबाहेर नेऊन शिरच्छेद करावा असा हुकूम फर्माविला. त्याच दिवशीं त्याचा मुलगा - दीर्घायुकुमार खेडेगांवांतून आईबापांच्या दर्शनासाठीं वाराणसीला आला होता. वाटेंतच आपल्या आईबापाला मागल्या हातांनीं बांधून त्यांचें मुंडन करून धिंड काढण्यात येत आहे, हें त्याच्या पहाण्यांत आलें. तो हळुहळु त्यांच्या मागोमाग जाऊं लागला. तेव्हां दीघीती म्हणाला, ''हे दीर्घायु, तुझी दृष्टी आकुंचित करूं नकोस किंवा अतिशय ताणूं नकोस, वैरानें वैरं शमत नाहीं, परंतु मैत्रीनेंच वैर शमन पावतें. हें लक्षांत ठेव.''

हे दीघीतीचे शब्द ऐकून राजपुरुष म्हणाले, ''हा दीघीती कोसल-राजा वेडा झाला असें दिसतें ! दीर्घायु कोण, आणखी हा त्याला असा कां उपदेश करतो, याचा आम्हांला तर कांही अर्थ समजत नाहीं !''

दीघीती म्हणाला, ''बाबांनो, तुम्ही मला खुशाल वेडा म्हणा ! परंतु जो शहाणा असेल तो माझ्या बोलण्याचा अर्थ समजेल.''

दीघीतीनें वरील वाक्य आणखी दोन वार उच्चारलें. तथापि राजपुरुषांला त्याचा अर्थ न समजल्यामुळें त्याला वेड लागलें असावें असें त्यांचें ठाम मत झालें. शेवटीं शहराबाहेर नेऊन दीघीतीचा आणि त्याच्या राणीचा त्यांनीं शिरच्छेद केला व त्या दोघांचे शरीरावयव चारी दिशांना फेंकून तेथें पहारा ठेऊन ते परत आले. हें सर्व कृत्य पाहून दीर्घायुकुमार वाराणसी नगरांत आला; आणि बरीच दारू विकत घेऊन त्यानें ती आपल्या पितरांच्या शरीरावयांवर पहारा करणार्‍या शिपायांस पाजली. ते बेशुद्ध पडले असें पाहून दीर्घायूनें काष्ठें गोळा करून पितरांच्या शरीराला अग्नी दिला, व त्या चितेला त्रिवार प्रदक्षिण केली. हा प्रकार काशिराजानें आपल्या प्रासादाच्या गच्चीवरून पाहिला, आणि तो मनांतल्या मनांत म्हणाला, ''हा कोणीतरी कोसलराजाचा नातलग असावा. अरेरे ! एवढा बंदोबस्त केला असतां मला असा कोणीतरी मनुष्य आहे हें पहारेकर्‍यांनीं कळवूं नये हें मोठेंच आश्चर्य होय ! यानें माझा घात केला नाहीं म्हणजे झालें !''

इकडे दीर्घायु आपल्या पितरांचें उत्तरकार्य आटपून अरण्यांत शिरला, व तेथें यथेच्छ रडून त्यानें आपल्या मनाचे समाधान करून घेतलें. नंतर स्नान करून शोकाचा मागमूसहि राहूं न देतां तो पुनः वाराणसींत शिरला आणि हस्तिशाळेंत जाऊन तेथील अधिकार्‍यांला म्हणाला, ''महाराज, माझ्या मनांतून माहुताची कला शिकण्याची फार इच्छा आहे. आपण मेहेरबानगी करून मला येथें ठेऊन घ्याल काय ?''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel