११५. क्षुद्र प्राण्याचेंहि वैर संपादन करूं नये.

(लटुकिक जातक नं. ३५७)


एक चिमणी हिमालयाच्या पायथ्याशीं असलेल्या महाअरण्यांत लहानशा झुडुपावर आपलें घरटें बांधून रहात होती. आमचा बोधिसत्त्व त्यावेळीं हत्तीच्या योनींत जन्मला असून वयांत आल्यावर हत्तींच्या प्रचंड कळपाचा राजा झाला होता. एके दिवशीं सर्व कळपाला घेऊन तो त्या झुडुपापाशीं आला, व तें आक्रमण करून जाण्याच्या बेतांत होता, इतक्यांत चिमणी घरट्यांतून बाहेर येऊन त्याला प्रणिपात करून म्हणाली, ''महाराज तुम्हांला मी साष्टांग प्रणीपात करितें. या लहानशा झुडुपावर माझें घरटें आहे व त्यांत ज्यांना अद्यापि पंख फुटले नाहीत अशी माझीं लहान लहान पारें आहेत. म्हणून महाराज या झुडुपाचा चुराडा करूं नका. माझ्या मुलाला जीवदान देऊन मला जन्मभर आपलें ॠणी करून ठेवा.''

गजराज म्हणाला, ''चिमणी बाई, तुम्ही निःशंक असा. तुमच्या घरट्याला किंवा पिलांला मी मुळींच धक्का लावून देणार नाहीं.''

असें म्हणून तें झुडुप आपल्या पोटाखालीं राहिल अशा बेतानें बोधिसत्त्व त्यावर उभा राहिला, व आपल्या सर्व युथाला त्यानें पुढें जाण्याचा हुकुम केला. हत्तींनीं आजूबाजूचे मोठाले वृक्षहि तोडून मोडून उध्वस्त केले. तथापि गजराज झुडुपावर उभा असल्यामुळें त्याला मुळींच धक्का लागला नाहीं. सगळा कळप तेथून गेल्यावर बोधिसत्त्व चिमणीला म्हणाला, ''बाई ग, तुझ्या पिलांचें माझ्या कळपापासून मीं रक्षण केलें आहे. परंतु माझ्या कळपांतून बाहेर पडलेला असा एक दुष्ट हत्ती या अरण्यांत फिरत आहे. तो तुझ्या पिलांचा नाश करील अशी मला भीती वाटते. तेव्हां तूं लवकर आपल्या पिलांना घेऊन दुसरीकडे जा.''

असें सांगून बोधिसत्त्व आपल्या कळपाच्या मागोमाग तेथून निघून गेला. चिमणीनें असा विचार केला कीं, ''हत्ती किती जरी वाईट असला, तरी तो माझ्या पिलांचा संहार कां करणार ? या अरण्यांत झाडपाला विपुल असतां एवढ्याशा झुडुपांपासून त्याला काय फायदा होणार ? तो एथें आलाच तर त्यालाहि आपल्या रक्षणाबद्दल नम्रपणें विनंती करावी म्हणजे झालें.''

तो दुष्ट हत्ती कांहीं दिवसांनीं त्या ठिकाणीं आला. तेव्हां चिमणीनें त्याची फार स्तुति करून आपल्या पोरांचे रक्षण करावें अशी त्याला विनंती केली. परंतु त्या दुष्ट हत्तीनें तिची अवहेलना करून त्या झुडुपावर हल्ला केला आणि तो तिला म्हणाला, ''तुझ्यासारखा यःकश्चित् प्राणी माझ्याजवळ याचना करण्यास देखील योग्य नाहीं ! असें असतां तूं माझ्याशीं फारच सलगी केलीस या तुझ्या अपराधाबद्दल झुडुपांसहित तुझें हें घरटें मी पायाखालीं तुडवून टाकतों. तूं जरी माझ्या तडाख्यांतून पळून दूर गेली आहेस तथापि, घरट्याचा नाश केल्यानें पुनः हत्तीसारख्या बलाढ्य प्राण्याशीं अतिप्रसंग करुं नये याची तुला चांगली आठवण राहिल.''

असें बोलून हत्तीनें त्या झुडुपाचा आणि चिमणीच्या घरट्याचा चुराडा करून टाकला. तेव्हां चिमणी त्याला म्हणाली, ''तूं जरी बलाढ्य प्राणी आहे, तरी या तुझ्या दुष्ट कृत्याबद्दल मी तुझा सूड उगवीनच उगवीन. बलाचा दुरुपयोग केला तर त्याचा परिणाम काय होतो हें तुला लवकरच समजून येईल.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel