२. प्रयत्‍नाचें फळ

(वण्णुपथ जातक नं. २)

आमचा बोधिसत्व काशीराष्ट्रामध्यें सार्थवाह कुळांत जन्माला येऊन वयांत आल्यावर आपल्या पित्याचा धंदा करीत असे. एकदां तो व्यापारासाठीं मरुमंडळांतून जात असतां वाटेंत एका साठ योजनें लांबीच्या वाळूच्या मैदानाजवळ आला. ह्या मैदानांतील वाळू इतकी सूक्ष्म होती कीं ती मुठींत देखील रहात नसे. सकाळीं पहिल्या प्रहरानंतर ह्या मैदानांतून प्रवास करण्याची सोय नव्हती. सूर्यकिरणांनीं वाळू संतप्‍त होऊन जात असल्यामुळें तिच्यावरून माणसाला अगर जनावराला चालत जाणें शक्यच नव्हतें.

बोधिसत्त्वानें ह्या मैदानाजवळ आल्यावर एक वाटाड्या घेतला. हा एक वाळूचा मोठा समुद्रच असल्यामुळें वाटाट्यावाचून तरून जातां आला नसता. तो वाटाड्या पुढच्या गाडींत एका चौरंगावर बसून आकाशांतील तार्‍यांच्या अनुरोधानें त्या लोकांना रस्ता दाखवीत असे. सर्व रात्र प्रवास करून सूर्योदयाचे वेळीं सर्व गाड्या एका ठिकाणीं वर्तुळाकार ठेवीत असत, व त्यावर तात्पुरता मंडप करून त्या खालीं सगळीं माणसें आणि जनावरे सारा दिवस विश्रांति घेत असत.

याप्रमाणें आमचा बोधिसत्त्व व त्याबरोबर असलेले लोक त्या वालुकाकांतारांतून जात असतां दुसर्‍या टोंकाला आले. आतां जवळचीं गांवें एका मुक्कामाच्या पल्ल्यावर राहिलीं होतीं. तेव्हां तो वाटाड्या म्हणाला, ''आम्हीं वाळूच्या मैदानांतून गांवाच्या नजीक येऊन पोहोंचलों. आज रात्रीं ह्या मुक्कामाहून निघालों म्हणजे उद्यां सकाळीं आम्हीं एका संपन्न गांवाला जाऊन पोहचूं. आतां पाणी आणि लांकडे बरोबर घेण्याचें कांही कारण राहिलें नाहीं.''

त्या वाटाड्याच्या सांगण्याप्रमाणें बोधिसत्त्वाच्या लोकांनी सर्पण आणि पाणी तेथेंच टाकून देऊन ते पुढल्या प्रवासाला निघाले.

एक दोन आठवडे वाटाड्याला रात्रीं मुळींच झोंप न मिळाल्यामुळें तो अगदीं थकून गेला होता. मध्यरात्रींच्या सुमारास बसल्या ठिकाणींच त्याला नीज आली, आणि त्याची गाडी भलत्याच मार्गानें वळली हें त्याला समजलें देखील नाहीं. अवशेष रात्र बैल चालत जाऊन पुनः मागल्या मुक्कामावर आले. वाटाड्याच्या गाडीच्या मागोमाग इतर गाड्या चालत असल्यामुळें त्या सर्व तेथें येऊन पोहोंचल्या. अरुणोदयाचे सुमारास वाटाड्या जागा होऊन पाहतो तों त्याला आपण पूर्वीच्याच ठिकाणीं येऊन पोंचल्योचें समजून आलें, आणि तो मोठ्यानें ओरडला. ''गाड्या मागें फिरवा. मागें फिरवा.''

त्या मंडळींत फारच गडबड उडून गेली. आपण कोठें पोंचलों, हें कोणास समजेना. वाटाड्याच्या सांगण्याप्रमाणें गाड्या माघार्‍या वळवण्यांत आल्या. परंतु इतक्यांत सूर्योदय झाला. गाड्या वर्तुळाकार करून त्यावर मंडप घालून ते लोक आपापल्या गाडीच्या खालीं शोकाकुल होऊन पडले ! जो तो म्हणाला, ''काय हो आम्ही पाणी फेंकून दिलें आणि आतां पाण्यावांचून तळमळून मरण्याची आमच्यावर पाळी आली आहे.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel