दीनवाण्या स्वरानें उंदरीण त्याला म्हणाली, ''तात्या, माझ्यावर विश्वास तरी ठेवून पहाना. मी खोटें बोललें तर आणखी एक दोन दिवसांनीं तुम्ही माझा खुशाल प्राणा घ्या.''

हा संवाद झाल्यावर मुंगुसानें त्याला सोडून दिलें व त्या दिवसापुरती दुसरी कांहीं शिकार साधून आपला निर्वाह केला. पण दुसर्‍या दिवशीं माघ्यान्हसमय होण्यापूर्वीच तो उंदरीणबाईच्या बिळाजवळ हजर झाला. बोधिसत्त्वानें सकाळीं आणून दिलेल्या मांसांतील एक भाग देऊन उंदरीनें त्याला संतुष्ट केलें. हा प्रकार बरेच दिवस चालला, तेव्हां दुसर्‍या एका मुंगुसाला हें वर्तमान समजलें व त्यानें उंदरीवर झडप घातली. त्याला देखील मांसाचा वाटा देण्याचें अभिवचन देऊन उंदरीनें आपली सुटका करून घेतली. त्यानें ही गोष्ट आपल्या मित्राला सांगितली तेव्हां त्यानें उंदरीणबाईला पकडण्याची पहिली संधि साधून घेतली, व आपल्याला मांसाचा वाटा देण्याची कबुली घेऊन सोडून दिलें. याप्रमाणें क्रमानें चार मुंगूस उंदरीणबाईच्या मांसाचे वाटेकरी झाले. बोधिसत्त्वानें आणलेलें सर्व मांस त्यांना देऊन बिचार्‍या उंदरीला अरण्यांतील फलमूलांवर आपली उपजीविका करणें भाग पडलें. ती दिवसेंदिवस अशक्त होत चालली. तें पाहून एके दिवशीं बोधिसत्त्व तिला म्हणाला, ''बाई तूं इतकी रोड कां दिसतेस ? तुला कांहीं आजार झाला नाहीं ना ? मला जर तुझ्या दुर्बलतेचें कारण समजेल तर मी त्यावर माझ्या हांतून होईल तेवढा उपाय करण्यास कसून करणार नाहीं.''

ती म्हणाली, ''तात्या, मला दुसरा कोणताही रोग नाहीं; परंतु तुम्ही आणून दिलेलें मांस माझ्या पोटांत जात नसून शत्रूंच्या पचनीं पडतें. त्यामुळें वन्य पदार्थांवर मोठ्या मुष्किलीनें मला कसा बसा जीव धरून रहावें लागतें. शत्रूवर रोंज नजर पडल्यामुळें माझी मानसिक व्यथा वाढत जाऊन तिचा परिणाम देहावर देखील घडून आला आहे.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''असे तुझे शत्रू तरी कोण ? त्याची मला तूं इतके दिवस खबर कां दिली नाहींस ?''

तिनें घडलेलें सर्व वर्तमान बोधिसत्त्वाला सांगितलें. तेव्हां तो म्हणाला, ''या दुष्ट मुंगुसांचा मी ताबडतोब बंदोबस्त करितों. तूं कांहीं भिऊं नकोस. शत्रूंला लांच देऊन मित्र करूं पहाणें ही मोठी चूक होय. अशी जी म्हण आहे तिचा प्रस्तुत प्रकरणीं प्रत्यक्ष अनुभव येत आहे. एका मुंगुसाला तूं लांचानें वळविण्याचा प्रयत्‍न केलास त्यामुळें तुझ्यावर उपाशीं मरण्याची पाळी आली. आतां या सर्वांचा बंदोबस्त होईपर्यंत मी तुला थोडें अधिक मांस देत जाईन. त्यावर तूं आपला निर्वाह कर, व त्यांनाहि संतुष्ट ठेव. मी त्यावर कांहीं उपाय योजणार आहें अशी त्यांस शंका येऊं देऊं नकोस.''

उंदरीण म्हणाली, ''पण तात्या, तुम्ही यांचा बंदोबस्त कसा करणार ? हे मुंगूस म्हटले म्हणजे असे लबाड असतात कीं, ते माणसाच्या वार्‍याला देखील उभे रहावयाचे नाहींत मग तुम्हाला ते कसे पकडतां येतील ?''

बोधिसत्त्व म्हणाला, ''बाई त्याबद्दल तूं काळजी करूं नकोस. कांहीं दिवस दम धर व मी काय करतों तें पहा.''

बोधिसत्त्वानें त्या बिळाच्या आसपास पडलेले मोठमोठाले दगड तासून त्यांची एक सुंदर गुहा बनविली व तिला काचेचा जाड दरवाजा बसवून तो उंदरीला म्हणाला, ''बाई, मी तुझ्या अन्नापाण्याची या गुहेंतच व्यवस्था करतों. तूं स्वस्थ आंत बसून रहा व मुंगूस तुझ्याजवळ मांस मागावयास आले तर दरवाज्याच्या आंतून यथेच्छ शिव्या दे. ते तुला एक केसहि वाकवूं शकणार नाहीं हें पक्कें ध्यानांत ठेव.''

बोधिसत्त्वाच्या सांगण्याप्रमाणें उंदरीण मुंगुसांची वाट पहात गुहेच्या दरवाजाच्या आंत बूसन राहिली. इतक्यांत नियमाप्रमाणें पहिला मुंगूस येऊन आपला हिस्सा मागूं लागला, तेव्हां ती त्याला म्हणाली, ''मुर्खा, माझ्याजवळ तुझ्या बापानें ठेव ठेवण्यास दिली आहे काय ? नीचा, तुला जर मांस पाहिजे असेल तर आपल्या पोरांला मारून खा.''

उंदरीचें असलें अपमानकारक भाषण ऐकून मुंगूस अत्यंत संतप्‍त झाला. त्याचा कोप गगनांत मावेना. दरवाजा खुला आहे असें वाटून त्यानें एकदम तिच्यावर उडी टाकली. पण आड आलेल्या जाड आरशावर तो आदळला, व उरःस्फोट होऊन तेथेंच मरण पावला. त्याच्या जातभाईंनीं मांसाची मागणी केल्याबरोबर उंदरीनें त्यावर शिव्यांची लाखोली वाहिली व ते देखील क्रोधानें संतत्प होऊन गुहेच्या दरवाजावर आदळून मरण पावले. तेव्हांपासून उंदरीची बोधिसत्त्वावर विशेष मर्जी बसली, व जवळ असलेला सर्व ठेवा तिनें त्याच्या स्वाधीन केला. बोधिसत्त्वानेंहि यावज्जीव तिचा मोठ्या ममतेनें संभाळ केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel