६१. मंत्राचा दुरुपयोग.

(संजीवजातक नं. १५०)

एका जन्मीं बोधिसत्त्व मोठा पंडित होऊन तक्षशिला येथें पुष्कळ शिष्यांना शास्त्र शिकवीत असे. संजीव नांवाचा त्याचा एक आवडता शिष्य होता; त्याला मृतप्राण्याला जिवंत करण्याचा त्यानें एक मंत्र शिकविला. संजीवाला आपल्या मंत्राचा प्रयोग करून पाहण्याची फार घाई झाली होती. आपल्या सहाध्यायांबरोबर अरण्यांत लांकडें गोळा करण्यास गेला असतां एक मरून पडलेला वाघ त्यानें पाहिला, आणि तो म्हणाला, ''गडेहो, गुरूनें शिकविलेल्या मंत्राचा प्रयोग करून मी या वाघाला जिवंत करतों, व मेलेल्या प्राण्याला कसें जिवंत करतां येतें याचें तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरण दाखवितों.''

ते म्हणाले, ''मित्रा, जरा दम धर, आम्ही झाडावर चढून बसतों व तेथून तूं वाघाला कसा उठवितोस हे पाहतों.''

ते झाडावर चढून बसल्यावर संजीवानें मंत्रप्रयोगाला सुरुवात केली, व खडे घेऊन तो वाघच्या अंगावर फेकुं लागला. मंत्रसमाप्ति झाल्याबरोबर मोठ्यानें किंकाळी फोडून वाघ त्याच्या अंगावर धांवला, आणि त्याला ठार मारून त्याचें प्रेत घेऊन दाट झाडींत पळून गेला, संजीवाच्या सहाध्यायांनीं घडलेली सर्व गोष्ट बोधिसत्त्वाला सांगितली. तेव्हां तो म्हणाला, ''मुलांनों, मंत्रप्रयोग करण्याची जो घाई करतो, व वेळ अवेळ न पहातां भलत्याच प्रसंगी आपल्या सामर्थ्याचा उपयोग करतो त्याची संजीवाप्रमाणेंच गत होत असते ! हें लक्षांत ठेवा, आणि आपल्या सामर्थ्याचा योग्य प्रसंगींच उपयोग करीत जा.''
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
६२. साधुत्वाची महती.

(राजोवादजातक नं. १५१)

एकदां बोधिसत्त्व वाराणसीराजाच्या महिषीच्या उदरीं जन्माला आला. वहिवाटीप्रमाणें त्याचें ब्रह्मदत्त हेंच नांव ठेवण्यांत आलें. कालांतरानें तक्षशिलेला जाऊन तो सर्व विद्यांमध्यें पारंगत झाला; व बापाच्या पश्चात् गादीवर बसला. छंद, द्वेष, भय आणि मोह या चार गोष्टींमुळें सत्ताधिकारी लोकांकडून भयंकर अपराध किंवा चुका घडत असतात. परंतु आमचा बोधिसत्त्व या गोष्टींपासून सर्वथैव परावृत्त झाल्या कारणानें त्याच्या हातून राज्यपद्धतींत कोणतीहि चूक झाली नाहीं. एवढेंच नव्हे सर्वकाळ आपल्या प्रजेच्या हितांत दक्ष असल्यामुळें बाधिसत्त्वाची कारकीर्द प्रजेला फारच सुखकारक झाली. असें सांगतात कीं, बोधिसत्त्व अत्यंत कुशाग्र असल्याकारणानें त्याच्यासमोर खोटा खटला आणण्यास कोणीच धजेनासा झाला. न्यायाधीशहि लांच लुचपत घेऊन भलताच निवाडा देण्यास धजेनासे झाले. तेव्हां वाराणसीच्या राज्यांत न्यायासनें ओस पडण्याच्या बेतांत आली. न्यायाधिशांनीं सर्व दिवस न्यायासनावर येऊन बसावें व खटला आणणारा गृहस्थ न सांपडल्यामुळें पुनः घरीं जावें, असा प्रकार सुरू झाला ! दिवसेंदिवस बोधिसत्त्वापाशीं एक देखील तक्रार येईनाशी झाली. तेव्हां तो आपणाशींच म्हणाला, ''माझ्या कारकीर्दीत राष्ट्रांतून खोटे खटले नष्ट झाले आहेत. सर्वत्र लोक सचोटीनें आणि दक्षतेनें वागत आहेत. ज्याच्या त्याच्या तोंडून माझी स्तुतीच मला ऐकुं येते. पण कदाचित् माझ्या जवळच लोक माझे अवगुण दाखवण्यास घाबरत असतील. मी जर येथून दूरच्या गांवीं गेलों तर तेथें कदाचित् माझे दोष ऐकण्याची मला संधि सांपडेल.'' असा विचार करून बोधिसत्त्व अज्ञात वेषानें आपल्या रथांतून काशीराष्ट्राच्या सरहद्दीपर्यंत गेला. वाटेंत गरीब आणि श्रीमंत प्रजेची त्यानें भेट घेतली. त्यांच्याशीं तो मोकळ्या मनानें बोलला. तेहि हा कोण आहे हें ठाऊक नसल्यामुळें याच्याशीं सर्व गोष्टी मोकळ्या मनानें बोलले. परंतु ब्रह्मदत्त राजाची गोष्ट निघाल्याबरोबर सर्वजण त्याजविषयी अत्यंत प्रेम दर्शवीत असत. बोधिसत्त्वानें राजाचे कांहीं दोष असतील अशी शंका घेतली असतां लोक हा कुकल्पना करणारा गृहस्थ आहे, याच्याशीं बोलण्यांत अर्थ नाहीं असें म्हणून उठून जात. किंवा त्याची टवाळी तरी करीत. अर्थात् आपल्या राज्याच्या सरहद्दीपर्यंत बोधिसत्त्वाला आपल्या अंगचा अवगूण दाखविणारा एकहि मनुष्य सांपडला नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel