बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, आम्हीं पडलों अरण्यवासी; कधीं अध्यापन करण्याचा आमच्यावर प्रसंग नसतो. तेव्हां आपल्या मुलाला सन्मार्ग दाखविण्याचें काम माझ्या हातून पार पडेल असें मी खात्रीनें सांगू शकत नाहीं. तथापि त्याला एकट्यालाच माझ्या आश्रमांत पाठवून दिल्यास शक्य तेवढा प्रयत्‍न करून पाहीन.''

बोधिसत्त्वाच्या सांगण्याप्रमाणें राजानें आपल्या पुत्राला आश्रमांत पाठविलें. राजकुमाराचा नोकराचाकराशीं आणि दरबारांतील ब्राह्मणाशींच काय तो संबंध होता. ते सर्वजण आपल्या बापाचें नोकर आहेत या विचारानें तो त्यांना वाटेल तसें वागवीत असे. परंतु येथें बोधिसत्त्वाशीं गांठ होती. राजा देखील याच्यासमोर आपलें डोकें वाकवितो, असें कुमाराच्या ऐकण्यांत आलें होतें; व, त्यामुळें मोठ्या आदरानें आश्रमांत प्रवेश करून व बोधिसत्त्वाला नमस्कार करून तो एका बाजूला बसला. बोधिसत्त्वानें त्याला हितोपदेश करून पुनः दुसर्‍या दिवशीं येण्यास सांगितलें. त्याच्या सांगण्याप्रमाणें राजकुमार नियमानें आश्रमांत जाऊं लागला.

एके दिवशीं बोधिसत्त्व त्याला बरोबर घेऊन उद्यानांत फिरावयास गेला. तेथें एक निंबाचा रोप उगवला होता. त्याकडे बोट दाखवून बोधिसत्त्व राजकुमाराला म्हणाला, ''या झाडाची तुला परीक्षा नाहीं. तेव्हां याचीं दोन चार पानें खाऊन पहा बरें.''

राजकुमारानें ताबडतोब त्या रोपाचीं पानें चावलीं, व तोंड कडू झाल्यामुळें संतापून जाऊन त्यानें तो रोप उपटून टाकला. बोधिसत्त्व म्हणाला, ''हें तूं काय केलेंस ?''

राजकुमार म्हणाला, ''भदंत, असलें हें झाड वाढूं देणें योग्य आहे काय ? याचीं दोन तीन पानें चावल्याबरोबर माझें तोंड इतकें कडू झालें कीं, माझ्या सर्व अंगांज जणूं काय कडवटपणाच शिरला ! तेव्हां अशा झाडाला लहानपणींच उपटून टाकलें असतां लोकांच्या वेदना कमी करण्याचें श्रेय मला मिळणार नाहीं काय ?''

बोधिसत्त्व म्हणाला. ''हें झाड वृध्दिंगत झालें तर त्याचीं पानें आणि फळें लोकांनीं खाल्लींच पाहिजेत अस नाहीं; परंतु तूं जर तुझ्या कडवट स्वभावासह वृध्दिंगत झालास, तर त्याचीं अत्यंत कडू फळें तुझ्या प्रजेला जबरदस्तीनें भोगावीं लागणार नाहींत काय ? आणि त्यांनीं जर तुझें आतांच उन्मूलन करून टाकलें तर त्यांना दोष देतां येईल काय ? या गोष्टीचा तूं नीट विचार कर आणि आपला स्वभाव गोड करण्याचा प्रयत्‍न कर. जर तुझा स्वभाव असाच कडू राहिला, तर जशी तूं या निंबाच्या रोपाची वाट लावलीस तशीच काशीराष्ट्रवासी लोक तुझी वाट लावतील हें पक्कें लक्षांत ठेव.''

बोधिसत्त्वाचा हा उपदेश राजकुमाराच्या मनावर इतका बाणला कीं, त्यानें सतत प्रयत्‍नानें आपल्या सर्व दुष्ट खोडी सोडून देऊन चांगले गुण संपादन केले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel