४७. एकाला अपाय तो दुसर्‍याला उपाय.

(असिलक्खणजातक नं. १२६)

प्राचीन काळीं वाराणसी नगरींत ब्रह्मदत्त नांवाचा राजा राज्य करीत असतां त्याच्या पदरीं तरवारीची परीक्षा करणारा एक ब्राह्मण रहात असे. याला असिलक्षण पाठक ब्राह्मण असें म्हणत असत. तो एखाद्या लोहारानें राजाच्या उपयोगासाठीं नवीन तलवार आणली असतां तिचा वास घेऊन परीक्षा करीत असे. या त्या कौशल्यामुळें राजानें त्याला तलवारीचा परीक्षक नेमिलें होतें. पण हा अधिकार हातीं आल्यावर तो लोहाराकडून लांच घेऊन वाईट तलवारी चांगल्या ठरवूं लागला, आणि लाच न मिळाला तर चांगल्या तलवारीहि वाईट ठरवू लागला. ज्याला ही गोष्ट माहीत नव्हती अशा एका दूरच्या लोहारानें राजासाठीं उत्तम तलवार करून आणली. पण असिलक्षणपाठकाला लांच न मिळाल्यामुळें ती खोटी ठरली. त्या लोहारानें हा ब्राह्मण लबाड आहे हें तेव्हांच जाणलें, व याची खोड मोडण्यासाठीं त्यानें दुसरी एक अत्यंत तीक्ष्ण धारेची तलवार बनवून ती मिरचीच्या पुडींत चांगली लोळवून म्यानांत घालून दरबारांत आणली. राजानें असिलक्षणपाठकाला तिची परीक्षा करण्याचा हुकूम केला. त्यानें एकदम म्यानांतून काढून तिला आपल्या नाकाजवळ नेलें. मिरचीच्या पुडीच्या वासामुळें त्याला जोरानें शिंका आल्या, त्यायोगें हात घसरून त्याचें नाक कापलें गेलें ! राजानें आपल्या वैद्यांना बोलावून आणून ओषधोपचार करविले. व असिलक्षणपाठकाला गूण पडून जखम साफ बरी झाल्यावर एक लाखेचें कृत्रीम नाक करवून त्याच्या नाकावर बेमालूम बसवून देण्यास लाविलें. असिलक्षणपाठक राजाच्या मर्जीतील असल्यामुळें त्याचा गुन्हा उघडकीस आला होता, तथापि त्याला दरबारांतून घालवून देण्यांत आलें नाहीं. तो आपल्या कृत्रीम नासिकेसह राज्यसेवेला तत्पर राहिला.

या राजाला एकुलती एकच कन्या होती. तिचें लहानपणापासून आपल्या आतेभावावर म्हणजे राजाच्या भाच्यावर अत्यंत प्रेम जडलें. राजाला ही गोष्ट इष्टच वाटत होती. आपली कन्या भाच्याला देऊन त्यालाच आपल्या मागें गादीचा वारस करावें असा त्याचा बेत होता. परंतु त्याच्या मंत्र्यांचें असें म्हणणें होतें कीं, राजकन्येला एक बलाढ्य राजा वर मिळाला असतां आपल्या राजाचें हित होईल. त्यामुळें आपल्या आणि त्या राजाच्या राष्ट्रांत निकट हितसंबंध जुळून येऊन परस्परांची परस्परांला मदत होईल. राजाला हा सल्ला विशेष आवडला; व आपला पहिला बेत त्यानें रहित केला. परंतु त्याचा भाचा आणि मुलगी या दोघांमध्यें वृध्दिंगत होत असलेलें प्रेम खच्ची करणें फार कठीण होतें. तथापि निराश न होतां त्यानें त्या दोघांला एकत्र रहाण्याची सक्त मनाई केली. मुलीला राजवाड्यांत ठेऊन भाच्याला दूर दुसरें एक घर बांधून देण्यांत आलें.

नदीच्या प्रवाहाला बांध घातला असतां पाणी तुंबून जाऊन तें कोठून तरी बाहेर पडण्याची मार्गप्रतीक्षा करीत असतें. तद्वत् प्रेमाचीहि स्थिती आहे. त्याला कोणी आडकाठी केली असतां त्याचा जोर वाढत जाऊन तो भल्या किंवा बुर्‍या मार्गानें बाहेर पडल्यावांचून रहात नाहीं. राजकन्या आणखी तिचा भावी पति यांची प्रत्यक्ष गांठ पडत नव्हतीं. तथापि, अप्रत्यक्ष दासींच्या द्वारें दोघांचीहि भेट कशी जुळवून आणतां येईल या संबंधानें त्यांची खलबतें चालूं होतीं पण त्यांना भेटीचा योग जुळवून आणण्यास युक्ति सांपडली नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel