८५. मातृभक्ति.

(चूलनंदियजातक नं. २२२)


बोधिसत्त्व एकदां नंदिय नांवाचा वानर होऊन अरण्यांत रहात असे. त्यांच्या धाकट्या भावाचें नांव चुल्लनंदिय असें होतें. कांहीं काळानें नंदियाला वानरयुथाचें स्वामित्व मिळालें. वानरगणाला बरोबर घेऊन तो मोठ्या सावधगिरीनें अरण्यांत फिरत असे, पण त्यामुळें त्याच्या वृद्ध आणि अंध आईच्या दर्शनाला त्याला वारंवार जातां येईना. आपल्या कळपांतील वानराकडून तो तिच्यासाठीं फळें वगैरे पाठवीत असे. पण ही फळें बिचार्‍या वृद्ध वानरीला न पोंचतां वाटेंतच खलास होत असत ! बर्‍याच दिवसांनी एकदां नंदिय आपल्या आईच्या दर्शनास गेला असतां आई अत्यंत कृश झालेली त्याला आढळली. तेव्हां तो म्हणाला, ''आई, तुझी अशी गति कां ?''

ती म्हणाली, ''मुला, मला आज बरेच दिवस पोटभर खाण्यास मिळत नाहीं. माझे हातपाय दुर्बल झाल्यामुळें मला स्वतः झाडावर चढून फळें, पाला वगैरे खाण्याचें सामर्थ्य राहिलें नाहीं. तुझ्या कळपांतील वानर कधीं कधीं माझ्यासाठीं कांहीं आणून देतात, परंतु तें मला पुरत नाहीं. म्हणून ही माझी अशी दशा झाली आहे.''

नंदियाला आपल्या आईचे असे हाल झालेले पाहून अत्यंत उद्वेग झाला. तो ताबडतोब आपल्या कळपांत जाऊन वानर समुदायाला म्हणाला, ''भो मर्कट, तुम्ही आजपासून माझ्या भावाला आपल्या कळपाचा पुढारी करा. कां कीं, मी आई जिवंत असेपर्यंत तिच्या सेवेंत दक्ष राहण्याचा निश्चय केला आहे. तेव्हां माझ्यानें यापुढें पुढारी या नात्यानें आपली सेवा व्हावयाची नाहीं.''

वानर समुदायाच्या मतें चुल्लनंदियाला धुरीणत्व देण्याचें ठरलें. परंतु त्यानें तें नाकारलें. तो म्हणाला, ''आमची आई आतां फार दिवस जगेल असें वाटत नाहीं. वानरगणाचा राजा होऊन मी चैनींत काळ घालवूं लागलों तर मातृसेवेचें पुण्य माझ्या पदरी पडणार नाहीं. म्हणून मी देखील माझ्या वडील भावाबरोबर आईची शुश्रूषा करण्याचा निश्चय केला आहे.''

वानरांनीं आपणांपैकी दुसरा एक राजा निवडून या दोघांनाहि मोकळें केलें; आणि ते तेव्हांपासून आपल्या आईचा सांभाळ स्वतः करू लागले.

त्या काळीं वाराणसींतील एक ब्राह्मण कुमार तक्षशिलेला जाऊन तेथें पाराशर्य नांवाच्या प्रसिद्ध आचार्यापाशीं राहिला आणि द्वादश वर्षे अध्ययन करून सर्व शिल्पांत पारंगत झाला. उदरनिर्वाहासाठीं तो परत वाराणसीला आला. परंतु त्याच्या अंगीं व्यवहार नैपुण्य नसल्यामुळें त्याला धंदा मिळेना. शेवटीं व्याधाचें काम करून त्यानें आपला उदरनिर्वाह चालविला. पूर्व संस्कारामुळें त्याला हा धंदा फार आवडला. आपल्या बायकोचें आणि दोन मुलांचें चांगलें पोषण करून घर दार बांधून त्यानें वाराणसी नगरींतच कायमची वस्ती केली.

एके दिवशीं शिकारीस गेला असतां त्याला कांहींच सांपडले नाहीं. रिक्त हस्तानें परत जाण्याची त्याच्यावरती पहिलीच पाळी होती. वाटेंत एका वृक्षावर नंदिय, चुल्लनंदिय आणि त्यांची आई हीं तिघेजणें बसलीं होतीं. आपल्या वृद्ध आईला पारधी अपाय करणार नाहीं असें जाणून त्या दोघां वानरांनीं वृक्षाच्या फांद्यांत दडी मारली. व्याधानें मर्कटीला पाहून असा विचार केला कीं, रिकाम्या हातानें घरीं जाऊन बायकोचा कोप करून घेण्यापेक्षां ह्या वृद्ध वानराला मारून नेलेलें बरें; निदान याच्या मांसानें आपल्या मुलांचा तरी निर्वाह होईल. त्यानें केलेलें शरसंधान पाहून नंदिय घाबरून गेला, आणि आपणाशींच म्हणाला, ''या क्षणांत मी पुढें सरसावलों नाहीं तर माझी आई प्राणास मुकणार आहे. एका दिवसा पुरतेंहि आईला जीवनदान देणें हें महत्पुण्य आहे. असें पुटपुटत तो दडलेल्या ठिकाणांतून आपल्या आईजवळ आला आणि म्हणाला, ''बा व्याधा, तूं या माझ्या वृद्ध आणि अंध आईला मारू नकोस. इच्या मांसानें एका माणसाचें देखील पोट भरणार नाहीं. पण मी भरज्वानींत आहें. इच्या ऐवजीं मला मारून नेशील तर तुझ्या सर्व कुटुंबाची तृप्ति होईल. तेव्हां इला जीवदान दे आणि मला मारून ने.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel