प्रस्तावना

पालिवाङ्‌मयांत जातकट्ठकथा या नांवाचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे. ह्यांत एकंदर ५४७ कथा आल्या आहेत. त्यांपैकी कांही कथांचा समावेश दुसर्‍या विस्तृत कथांत होत असल्यामुळें बाकी सरासरी ५३४ कथा शिल्लक रहातात. सिंहलद्वीपांत, ब्रह्मदेशांत आणि सयामांत जातकट्ठ कथा फारच लोकप्रिय आहेत. परंतु हिंदुस्थानांत-त्यांच्या जन्मभूमींत-त्यांचा परिचय फार थोड्यांना आहे. बुद्धसमकालीन समाजस्थितीवर लिहितांना बंगाली आणि इतर हिंदी तरुण पंडित अलिकडे त्यांचा फार उपयोग करूं लागले आहेत. परंतु त्यांनी जातकट्ठकथा समग्र वाचल्या असतील असें समजणें चुकीचें आहे. युरोपियन पंडितांनी लिहिलेल्या लेखांच्या आणि तयार केलेल्या अनुक्रमणिकांच्या भांडवलावरच बहुधा आमच्या पंडितांचा व्यापार चालला आहे.

जातकट्ठकथा प्रसिद्धीला आणण्याच्या कामीं ज्यांनी परिश्रम केले त्यांत व्ही. फॉसबोल (V. Fausboll) ह्या जर्मन पंडिताला अग्रस्थान दिलें पाहिजे. जर्मनी कोठें आणि सिंहलद्वीप कोठें ! पण 'किं दूरं व्यवसायिनाम्' ह्या न्यायानें या गृहस्थानें तेथून सिंहली ताडपत्री पुस्तकें गोळा करून त्यांच्या आधारावर, दुसर्‍या कोणाचें साहाय्य नसतां, रोमन अक्षरांनी जातकट्ठकथा छापण्यास १८७७ सालीं आरंभ केला; व १८९६ साली हे काम संपविलें. पूर्व तयारीसाठीं एक दोन वर्षे लागलीं असे गृहीत धरलें तर ह्या कामीं डॉ. फॉसबोल यांनी आपल्या आयुष्याचीं एकवीस-बावीस वर्षे खर्चिली असें म्हटलें पाहिजे, मध्यंतरी त्यांना पुष्कळ अडचणी आल्या. परंतु त्यांना न डगमगतां बोधिसत्त्वासारख्या अढळ उत्सासानें हें काम त्यांनी पार पाडलें. आजला ह्या त्यांच्या जातकट्ठकथेच्या संस्करणाचा युरोपियन व एतद्देशीय विद्वानांना फारच उपयोग होत आहे.

डॉ. फॉसबोलच्या संस्करणाच्याच आधारें ह्या गोष्टी लिहिल्या आहेत. मूळ गोष्टींचें यथार्थ भाषांतर न करतां सार मात्र आणण्याचा प्रयत्‍न केला आहे. जातकट्ठकथेंतील मनोरंजक आणि बोधप्रद कथा मुलांमुलींच्या वाचनांत येऊन प्राचीन समाजस्थितींचें त्यांना सहजासहजीं ज्ञान व्हावें, आणि बोधिसत्त्वाच्या सद्गुणांच्या अनुकरणानें आत्मोन्नति करतां यावी, या उद्देशानें हें पुस्तक लिहिलें आहें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel