बोधिसत्त्व फार दयाळू होता. त्याचें मन वळविण्यास कटाहकाला मुळीच आयास पडले नाहींत. शेवटीं त्याजकडून आपलें दासीपुत्रत्व उघडकीला न आणण्याबद्दल अभिवचन घेऊन कटाहक तेथून माघारा आला. त्या दिवसापासून तो श्रेष्ठीची दासाप्रमाणें सेवा करीत असे. श्रेष्ठी व्यापार्‍याच्या घरीं आल्यावर देखील कटाहकानें त्याची सर्वप्रकारें सेवा केली व त्याला प्रसन्न करून घेतलें.

एके दिवशीं कटाहक कांहीं कामानिमित्त बाहेर गेला असतां त्याची बायको बोधिसत्त्वाला भेटली. तेव्हां बोधिसत्त्व तिला म्हणाला, ''काय सूनबाई, माझा मुलगा तुम्हाला चांगल्या रीतीनें वागवतोना ?'' ती म्हणाली, ''मामंजी, आपल्या चिरंजीवाचा कोणताही दोष नाहीं, त्यांचें माझ्यावर फार प्रेम आहे. केवळ भोजनप्रसंगीं कधीं कधीं कांहीं पदार्थ वाईट लागला तर ते माझ्यावर संतापत असतात; हाच काय तो त्यांचा दोष आहे.'' ''मुली, माझा मुलगा लहानपणापासून असाच आहे. जेवण्याखाण्यांत त्याच्या फार खोडी असतात पण तूं वाईट वाटूं देऊं नकोस. त्याचें तोंड बंद करण्याचा एक मंत्र मी तुला शिकवून ठेवितों. तो तूं चांगला पाठ करून ठेव व जेव्हां माझा मुलगा तुझ्यावर रागावेल तेव्हां तो म्हणत जा. एक दोनदां या मंत्राचा प्रयोग केला असतां माझ्या मुलाची प्रकृति पाण्यापेक्षांहि थंड होईल हें मी तुला खात्रीनें सांगतों.''

श्रेष्ठी कांहीं दिवस त्या व्यापार्‍याच्या घरीं राहून वाराणसीला जाण्यास निघाला. कटाहक त्याच्याबरोबर बराच दूर अंतरावर गेला. व पुष्कळ नजराणे देऊन त्यानें त्याचा मोठा गौरव केला; आणि मोठ्या आदरानें साष्टांग नमस्कार करून पुनः आपल्या सासर्‍याच्या घरीं आला. या दिवसापासून त्याचा मान अधिकच वाढला. कां कीं, आतां त्याचें दासीपुत्रत्व उघडकीला येण्याचा संभव राहिला नाहीं. त्यामुळें बिचार्‍या बायकोला भोजन प्रसंगीं अधिक त्रास होऊं लागला. एके दिवशीं आपल्या नवर्‍यासाठी स्वहस्तानें चांगलें जेवण तयार करून तिनें वाढण्यास सुरुवात केली. पहिलाच पदार्थ कटाहकाला आवडला नाहीं. तो फार संतापला. त्याच्या बायकोला सासर्‍यानें दिलेल्या मंत्राची आठवण झाली व तिनें ताबडतोब त्याचा प्रयोग केला. ती म्हणाली ः-

बहुंपि सो विकत्थेय्य अञ्ञं जनपदं गतो ।
अन्वागन्त्वान दूसेय्य भुंज भोगे कटाहक ॥

अर्थ- दुसर्‍या देशांत जाऊन पुष्कळ बडबड करतां येते. पण परत येऊन तो हें उघडकीस आणील. तेव्हां हे कटाहक मुकाट्यानें मिळालेल्या पदार्थांचा उपभोग घे !

हा मंत्र कानीं पडल्याबरोबर कटाहक घाबरून गेला. श्रेष्ठीनें आपल्या हीनत्वाबद्दल सर्व कांहीं हिला सांगून ठेविलें असलें पाहिजे असें त्याला वाटलें. तेव्हांपासून बायकोवर संतापण्याची त्याची छाती झाली नाहीं. इतकेंच नव्हें तर तो नम्र आणि सालस बनला, व किती वाईट पदार्थ असला तरी त्यामुळें तो कधींहि चिडला नाहीं. जे काहीं मिळेल तेवढ्यानें संतुष्ट राहून आपला वेळ त्यानें सत्कर्मी खर्च केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel