९२. शीलाची परीक्षा.

(सीलवीमंसनजातक नं. ३०५)


एका काळीं बोधिसत्त्व वाराणसींत एका प्रसिद्ध आचार्यापाशीं शास्त्राध्ययन करीत असे. त्या आचार्याची एकुलती एक मुलगी वयांत आली होती. तिला आपल्या शिष्यांपैकीं एकाला द्यावी असा आचार्याचा बेत होता. पण तो अमलांत आणण्यापूर्वी आपल्या शिष्याचें शील कसोटीस लावून पहावें; आणि त्यांत जो उत्तम ठरेल त्यालाच मुलगी द्यावी. असा विचार करून एके दिवशीं तो आपल्या शिष्यांला म्हणाला, ''मुलांनो मी माझ्या एकुलत्या एक मुलीचें लग्न करूं इच्छित आहें. या मंगल समयी तुम्ही मला मदत केली पाहिजे. ती अशी कीं, प्रत्येकानें आपापल्या घरांतून एकेक वस्तू चोरून आणावी, आणी ती माझ्या स्वाधीन करावी. परंतु तुम्ही चोरी करतांना जर कोणी पाहील तर त्या वस्तूचा मी स्वीकार करणार नाहीं. तेव्हां कोणीहि प्राणी पहाणार नाहीं, अशा ठिकाणींच चोरी करून लग्नाच्या उपयोगी पडणारें सामान घेऊन या.''

सगळ्या शिष्यांनीं आपापल्या घरांतून कोणाला न कळत कोणी दागिना, तर कोणी कपडा, तर कोणी पैसे, अशा निरनिराळ्या वस्तू सवडीप्रमाणें चोरून आणून गुरूच्या हवालीं केल्या. गुरूनें जी वस्तू ज्या शिष्यानें आणली त्या वस्तूवर त्याच्या नांवाची चिठी बांधून ती आपल्या कोठींत निराळी ठेवून दिली. सर्वांनीं यथाशक्ति पदार्थ आणले, पण बोधिसत्त्वानें कोणतीच वस्तू आणली नाहीं. तेव्हां आचार्य म्हणाला, ''माझ्या सर्व शिष्यानीं यथाशक्ति कोणता ना कोणता पदार्थ आणला आहे. पण तूं मात्र कांहीं एक आणलें नाहींस ! किंबहुना आणण्याचा प्रयत्‍न देखील केला नाहींस ! मला वाटतें तूं या सर्व शिष्यांत अत्यंत आळशी आहेस !''

बोधिसत्त्व म्हणाला, ''गुरुजी, आपली आज्ञा न पाळण्याच्या हेतूनें किंवा आळसानें मी कांहीं प्रयत्‍न केला नाहीं असें नव्हे पण आपल्या हुकुमाप्रमाणें वागणें केवळ अशक्य आहे म्हणून मी खटपट केली नाहीं.''

आचार्यानें असे कां ? असा प्रश्न केल्यावर बोधिसत्त्व म्हणाला, ''गुरुमहाराज, ज्या ठिकाणीं पहाणार नाहीं अशाच जागीं चोरी करून आणा अशी आपली आज्ञा आहे पण अशी जागा भूमंडळावर कशी सांपडेल ? अरण्यांत वनदेवता आपलें कृत्य पहात असतात. अशा ठिकाणीं एकांत आहे अशी मूर्ख माणसाचीच काय ती समजूत असते ! आणि जेथें वनदेवता नाहींत अशा स्थळीं आपला अंतरात्माच आपलें कृत्य पहात असतो ! अर्थात् एकांत स्थळ सांपडणार कसें ! जेथें इतर प्राणी नसतात, त्या स्थळीं आपण स्वतः असल्यामुळें त्याला एकांतस्थळ म्हणतां येत नाहीं.'' हें बोधिसत्त्वाचें भाषण ऐकून आचार्य त्यावर फार प्रसन्न झाला आणि म्हणाला, ''बा मुला, तुम्हा सर्वांचें शील कसोटीला लावण्यासाठीं मी ही युक्ति योजिली होती. माझ्या शिक्षणाचें खरें रहस्य तुलाच समजलें असें म्हटलें पाहिजे. इतर विद्यार्थ्यांना तें समजलें असतें, तर त्यांनीं माझ्या बोलण्याचा विचार न करितां चोरून वस्तू आणल्या नसत्या !''

याप्रमाणें बोधिसत्त्वाची तारीफ करून आचार्यानें आपल्या मुलीशीं त्याचा विवाह लावून दिला. आणि इतर शिष्यांनीं आणलेल्या वस्तू ज्याच्या त्यास परत करून तो म्हणाला, ''मुलांनों आपल्या गुरूनें किंवा वडिलांनीं जरी कांहीं सांगितलें तरी त्याचा नीट विचार केल्याशिवाय आपण कार्याला प्रवृत्त होतां कामा नये. दुसर्‍याच्या विचारानेंच चालणारा मनुष्य फासल्याशिवाय रहात नाहीं. म्हणून तुमच्याच बुद्धीनें तुमच्या शीलाचें रक्षण करा.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel